सरकारच्या धोरणामुळे कामगारांची पिळवणूक - विरोधीपक्षनेते अंबादास दानवे
 
                                आताच्या सरकारच्या धोरणामुळे वेठबिगिरीपेक्षा अधिक कामगारांची पिळववणूक
शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे कामगार पदाधिकारी मेळाव्यात प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) आताच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे वेठबिगिरीपेक्षा अधिक कामगारांची पिळवणूक होत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवार, ता. 6 ऑक्टोंबर रोजी केले. भारतीय कामगार सेनेच्या वतीने हॉटेल प्रिन्स डेलीकसी येथे आयोजित कामगार पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
जुने सर्व कामगार कायदे बदलून एकच कामगार कायदे बनविण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण कामगारांना देशोधडीला लावणारे आहे. मोठमोठ्या उद्योगपतींच्या फायद्यांसाठी बनविले जाणारे हे कायदे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर विपरीत परीणाम करणारे आहे. कामगारांवर अन्याय करणाऱ्या या धोरणांना ताकदीने विरोध करून न्यायिक लढा उभा करणे गरजेचे असल्याची,भूमिका यावेळी दानवे यांनी मांडली.
हुकूमशाही सरकार आल्यापासून कामगारांना वेठबिगार बनविण्याचे कायदे बनविले जात आहे. आताच्या सरकारच्या चुकीचे धोरणामुळे कामगारांना नोकरीची शाश्वती राहिली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारच्या या जुलमी धोरणाविरोधात संविधानिक पद्धतीने लढा दिला गेला होता. त्यांच्याच कार्यकाळात कामगारांना न्याय देण्याचे काम शासनाने केले असल्याची, भावना यावेळी अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
कामगार बांधवांच्या बाबतीत केंद्र सरकार अत्यंत अन्यायकारी धोरण निर्माण करत आहे. कामगारांनी शासनाचे हे जुलमी धोरण कोणत्याही परिस्थितीत सहन न करता आपला विरोध सार्वजनिक ठिकाणी व्यक्त केला पाहिजे. जोपर्यंत कामगार आपला रोष सरकार समोर व्यक्त करणार नाही शासनाला कामगारांची भूमिका लक्षात येणार नाही. संभाजीनगर जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी सातत्याने शहरातील औद्योगिक क्षेत्रात अनेक नवीन रोजगार निर्माण झाल्याची खोटी माहिती जनतेला देतात. मोठमोठाली जाहिरात बाजी करत असले तरीही स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नसल्याची खंत दानवे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना व्यक्त केली.
भारतीय कामगार सेना सातत्याने कामगारांच्या न्यायिक लढ्यासाठी आवाज उठवत असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आस्था ठेवून ही संघटना काम करत असून कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने लढा देत राहणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या चुकीच्या धोरणांना संविधानिक पद्धतीने विरोध करायचा असेल तर आता मी विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला ताकद द्यावी लागेल. एकजुटेने पक्षाच्या पाठीशी उभे राहावे लागणार असल्याची विनंती वजा सूचना कामगार सेना संयुक्त सरचिटणीस प्रभाकर मते पाटील यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय कामगार सेनेचा मोठा प्रभाव पाडणारी भूमिका राहणार आहे. राज्यभर भारतीय कामगार सेनेची एक वेगळी स्वतंत्र ताकद आहे. शहरात येऊन एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कामगारांना आपल्या मूळ गावी मोठा मान असतो. त्यांच्या शब्दाला मान असल्याने सर्व कामगारांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षावर विश्वास ठेवून आपल्या कुटुंबीयांच्या भविष्यासाठी संभाजीनगरातील महाविकास आघाडीच्या पाठीमागे जनमत उभे करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन शिवसेना पश्चिम विधानसभा प्रमूख राजू शिंदे यांनी केले.
याप्रसंगी कामगार सेना संयुक्त सरचिटणीस प्रभाकर मते पाटील, उपजिल्हाप्रमख संतोष जेजुरकर, विधानसभा प्रमुख राजू शिंदे, उद्योजक सतिश मेटे, श्री. आहेर, गणेश नवले पाटील, विष्णु राऊत, गोकुळ मलके, कोमलसिंग इंगळे, शिवाजी तुरटवाड, विजय पांचाळ, नीलकंठ राठोड,यमाजी कुबेर व बाबासाहेब साबळे उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            