सरपंच पदाचा राजीनामा दिला नसताना खोटा अहवाल पाठवला म्हणून जलसमाधी आंदोलनाने खळबळ...!
सरपंच पदाचा राजीनामा दिला नसताना खोटा अहवाल पाठवला म्हणून जलसमाधी आंदोलनाने खळबळ
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.12(डि-24 न्यूज) कन्नड तालुक्यातील मकरणपूर येथील ग्रामस्थांनी सलिम अली सरोवरात जलसमाधी आंदोलन केल्याने खळबळ उडाली. आंदोलकांना तलावातून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना दोन तास तारेवरची कसरत करावी लागली.
अग्नीशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू बोटीच्या सहाय्याने तलावाच्या बाहेर काढले. जलसमाधी आंदोलनाच्या अगोदर पोलिस बंदोबस्त तैनात असून सुद्धा ग्रामस्थांनी नजर चूकवून तलावात उडी घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीचा अहवाल पाठवून सरपंच पद रद्द करणा-या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली होती तरीही कार्यवाही होत असल्याने जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.
आंदोलकांनी अधिका-यांशी चर्चा सुरू असताना खोल पाण्यात जाऊ लागले. जवानांनी रबरी रेस्क्यू बोटीच्या सहाय्याने पाण्यात उतरून त्यांना बाहेर काढले. आंदोलन पाहण्यासाठी सलिम अली सरोवरावर बघ्यांची गर्दी जमली होती.
कन्नड तालुक्यातील मकरणपूरच्या विद्यमान सरपंच सना शेख असलम आणि ग्रामस्थ गेली काही दिवसांपासून विविध शासकीय कार्यालयांच्या चकरा मारत होते. सरपंच व सदस्य पदाचा राजीनामा दिला नसताना संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत कार्यालयाने परस्पर शासन दरबारी राजीनामा दिल्याचे कळवून शासनाची फसवणूक केली. दोषींवर कारवाई करण्याची मागणी सना शेख व इतर सदस्य करत असताना कोणतीही दाद न मिळाल्याने बापू गवळी व इतर नागरीकांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सकाळी 11.30 वाजता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, पोलिस व अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले. बाहेर येऊन चर्चा करण्याची त्यांना विनंती केली. पाण्यात आंदोलन करणाऱ्या जावेद खान मजिदखान, शहजाद सिद्दीकी या दोघांना सिटी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले.
याप्रसंगी अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी एम.एल.मुंगसे, अशोक खांडेकर, एच.वाय.घुगे, जवान प्रसाद शिंदे, दिनेश मुंगसे, अजिंक्य भगत, महंमद मुजफ्फर, दिपक वरट, जगदीश, जगदीश सलामबाद यांनी पाण्यात उतरून बाहेर काढले. महसूल प्रशासनाचे अधिकारी व पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर, राजेंद्र साळुंके, मुनीर पठाण यांनी परिस्थिती हाताळली. या प्रकरणी आस्थापना विभागाचे उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी सना शेख व इतर सदस्य यांच्या निवेदनानुसार 7 दिवसांत समिती गठीत करावी व जिल्ह्यातील व इतर तालुक्यातील जवाबदार अधिका-यांची चौकशी समीती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
What's Your Reaction?