प्रशिक्षणातून नव उद्योजकांना प्रगतीची नवी दिशा - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

 0
प्रशिक्षणातून नव उद्योजकांना प्रगतीची नवी दिशा - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

"प्रशिक्षणातून नवउद्योजकांना प्रगतीची नवी दिशा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर"

एमसीईडीत नवउद्योजकांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा"

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19 (डि-24 न्यूज): नवउद्योजकांनी व्यवसाय करताना योग्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊन उद्योगक्षेत्रात प्रगती साधावी. कृषी आधारित उद्योग तसेच इतर व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रभावी वापर करा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, केंद्र शासन, नवी दिल्ली व जागतिक बँक पुरस्कृत, तसेच महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील नोंदणीकृत उद्योजकांसाठी एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन आज एमसीईडीच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त श्री. पापळकर बोलत होते.

कार्यक्रमाला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी मंगेश केदार, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक संजय कोटुरकर, एमसीईडीचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. पापळकर म्हणाले, “प्रशिक्षणातून दिशा मिळते. आपल्याला आवडत्या क्षेत्रातील व्यवसाय निवडता येतो आणि त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण संस्था पुरवतात. बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी निवडलेल्या व्यवसायाची व्यवहार्यता, परतफेडीची हमी आणि आपली क्षमता महत्त्वाची असते. त्यासाठी आपल्या बँक व्यवहारात सातत्य ठेवणे आवश्यक आहे.”

यावेळी उद्योजकांशी निगडित शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच रॅम्प अंतर्गत एमसीईडी प्रशिक्षित उद्योजकांच्या उत्पादनांच्या स्टॉल प्रदर्शनीचे उद्घाटन विभागीय आयुक्त यांच्या हस्ते झाले. कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे व जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी मंगेश केदार यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमसीईडीचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी भारती सोसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow