सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करा - पालकमंत्री संजय शिरसाठ

 0
सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करा - पालकमंत्री संजय शिरसाठ

सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करा – पालकमंत्री संजय शिरसाठ

                                                    गणेश मंडळांना परवानगीसाठी अडचण येऊ नये; वाहतूक, वीज व नागरी सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (डि-24 न्यूज)- सार्वजनिक गणेशोत्सव हा शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा. उत्सवाच्या आनंदाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासनासह महानगरपालिका, महावितरण व अन्य संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काटेकोर नियोजन करावे. गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या व नागरी सुविधांसंदर्भात अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज दिले.

सार्वजनिक गणेशोत्सव-२०२६ च्या पूर्वतयारीसंदर्भात पालकमंत्री संजय सिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली एमआयटी युनिव्हर्सिटी कॅम्पस, बीड बायपास रोड येथील मंथन हॉलमध्ये आज समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पना पिंपळे, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, महावितरणचे अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. शिरसाठ म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष नियोजन करावे. मुंबई येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे व्यवस्थापन, मिरवणूक मार्ग आणि विसर्जनस्थळी सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घ्यावी. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. महानगरपालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गणेश मंडळे आणि नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात.

गणेश मंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांवर भर द्यावा. उत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत नियमानुसार रात्री १२ वाजेपर्यंत ढोल पथके व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येतील. मात्र, उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याकडे पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचेही काटेकोर पालन करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री श्री. शिरसाठ यांनी दिले.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गणेशोत्सवासाठी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. शहरातील बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, मिरवणूक व विसर्जन मार्ग, गर्दीचे व्यवस्थापन यांचे नियोजन करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त स्तरावर गणेश मंडळांच्या बैठका घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. वाळूज व पंढरपूर परिसरासाठीही विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेश मंडळांना परवानगी प्रक्रियेत अनावश्यक अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. गतवर्षीप्रमाणे यंदाही डीजेच्या वापराबाबत प्रभावी कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

शहरात अंमली पदार्थांविरोधात गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळातही अवैध व समाजविघातक कृत्यांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष राहील. नागरिकांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त श्री. पवार यांनी केले.

उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक गणेश मंडळांना त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे प्रात्यक्षिक आणि सादरीकरण करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीपासून ‘ड्राय डे’ ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पना पिंपळे यांनी स्वच्छता, रस्ते, विसर्जनस्थळे तसेच अन्य नागरी सुविधांबाबत महानगरपालिकेने केलेल्या तयारीची माहिती दिली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात सुरक्षित व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

प्रास्ताविक पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow