स्ट्रांगरुम आणि मतमोजणी केंद्राची जिल्हाधिका-यांनी केली पाहणी
स्ट्रॉंगरुम आणि मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १९ औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची मतदान प्रक्रिया दि.१३ रोजी पार पडली. त्यानंतर मतदान यंत्रे एमआयटी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रुम मध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहेत. या सर्व व्यवस्थेची आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके त्यांचे समवेत होते. आज सायंकाळी सहा ते साडेसहा दरम्यान त्यांनी पाहणी केली. मतदान यंत्रांची स्ट्रॉंग रुम व मतमोजणी केंद्र एमआयटी कॉलेज येथील इमारतीत सज्ज करण्यात आले आहे. याठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस बलाचे १ तुकडी २५ जवान व एक कमांडर, राज्य राखीव पोलीस बल १ अधिकारी व ३० जवान आणि राज्य पोलीस दल १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक व २९ अंमलदारअशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. याशिवाय संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत आहे. मतदान यंत्र असलेल्या भागाचे सीसीटीव्ही फुटेज २४ तास अखंडीत पाहण्यासाठी उपलब्ध असून ही व्यवस्था उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांनी या सर्व व्यवस्थेची आज अचानक पाहणी केली. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
What's Your Reaction?