अखेर भाजपाचे समीर राजूरकर महापौर, उपमहापौर बनले शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ, महापौरांची सुत्रे हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट...
10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापौरपदी समीर राजूरकर, उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ विराजमान.... ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी, दोन ट्रक गुलाल उधळून जल्लोष... पोस्टर झळकावून कोणाला दिला जंजाळ यांच्या समर्थकांनी इशारा... छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर पहिले महापौर बनण्याचा बहुमान समीर राजूरकर यांना मिळाला आहे...
महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा प्रत्येकी 37 मतांनी दणदणीत विजयी, महापौर व उपमहापौर यांना प्रत्येकी 70 मते मिळाली, एमआयएमचे महापौर पदाचे उमेदवार अशोक हिवराळे व उपमहापौर पदासाठी उमेदवार वसीम अहेमद यांना प्रत्येकी 33 मते मिळाली, शिवसेना उबाठा, वंचित, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक तटस्थ राहिले तर काँग्रेसच्या नगरसेविका गैरहजर राहिल्या...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) - 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज छत्रपती संभाजीनगर शहराचे प्रथम नागरिक तथा महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली यामुळे आता शहरातील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्न मार्गी लागणार आहे. भारतीय जनता पक्षाचे समीर राजूरकर यांची शहराचे 23 वे महापौर तर उपमहापौर म्हणून शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा पिठासिन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केली. महायुतीचे महापौर व उपमहापौर यांचा 37 मतांनी दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत 11 नगरसेवक तटस्थ राहिले, ज्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 1 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या 1 सदस्याचा समावेश आहे. काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका मलिका हबीब कुरेशी या गैरहजर राहिल्या.
आज मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सर्व 114 नगरसेवकांचे महानगरपालिकेत आगमन झाले. सभागृहात सभा सुरू होण्यापूर्वी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी सर्व नगरसेवक उपस्थित असल्याबाबत खात्री करण्याची सूचना गटनेत्यांना केली. यावेळी काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका आलेल्या नसल्याचे दिसून आले. नगरसेवकांचे आगमन झाल्यानंतर वंदे मातरम् गीताने सभेचे कामकाज सुरू झाले. पीठासिन अधिकाऱ्यांनी महापौर पदासाठीच्या उमेदवारांच्या अर्जांची छानणी केली. माघार घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिल्यानंतर राजूरकर आणि एमआयएमचे अशोक हिवराळे यांचे अर्ज वैध घोषित करून हात उंचावून मतदान घेण्यात आले. या निवडणूक प्रक्रियेत एकूण 103 नगरसेवकांनी मतदान केले तर 11 नगरसेवक तटस्थ राहिले तर काँग्रेसच्या नगरसेविका गैरहजर राहिल्या. अशोक हिवराळे यांना एमआयएमच्या सर्व 33 नगरसेवकांनी हात उंचावून मत दिले. त्यानंतर राजूरकर यांना भाजपच्या 57 आणि शिवसेनेचे 13 अशा एकूण 70 नगरसेवकांनी हात उंचावून मत दिले. राजूरकर यांची महापौरपदी निवड झाल्याचे पिठासिन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घोषित करताच महायुतीच्या नगरसेवकांनी बाके वाजवून घोषणा देत जल्लोष केला.
दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली. शिवसेना शिंदे गटातर्फे राजेंद्र जंजाळ, तर एमआयएमचे(मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन) मो.वसीम अहेमद यांच्या दाखल अर्जाची छानणी पिठासिन अधिकाऱ्यांनी केली. दोघांचेही अर्ज वैध ठरल्यानंतर माघार घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला. कोणीही माघार न घेतल्याने दुपारी एक वाजता मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. हात उंचावून मतदान घेण्यात आले असता जंजाळ यांना 79 मते तर वसीम अहेमद यांना 33 मते मिळाली. जंजाळ यांचा 37 मतांनी दणदणीत विजय झाला. महापौरपदी राजूरकर व उपमहापौरपदी जंजाळ यांची निवड झाल्यानंतर पिठासिन अधिकारी दिलीप स्वामी व मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी त्यांना संविधानाची प्रत, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी राजूरकर यांनी महापौरांसाठीचा विशेष गाऊन परिधान केला. राष्ट्रगीत व राज्यगीताने सभेचा समारोप झाला.
महापौर व उपमहापौर निवडणुकीतील क्षणचित्रे...
आज मंगळवारी सकाळी 10.45 वाजता एमआयएमच्या (मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन) पक्षाचे नगरसेवकांचे सर्वात आधी महापालिकेत आगमन झाले. त्यांनी शेरवानी परिधान करत, हिरवा फेटा, पक्षाची पतंग निशानी लावून "नारे तकबीर अल्लाहु अकबर", ओवेसी, इम्तियाज जलील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है घोषणाबाजी केरत पायी महापालिका मुख्यालयात दाखल झाले. महीला नगरसेवकांनी बुरखा परिधान करत डोक्यावर हिरवा फेटा बांधून आगमन झाले.
मोदी जॅकेट, भगवे फेटे, गळ्यात रुमाल घालून भाजपचे सर्व नगरसेवक, तर भगवे फेटे व गळ्यात भगवा रुमाल घालून शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवकांचे एसी कोच बसवर भगवे झेंडे लावून सकाळी 11 वाजता आगमन झाले. यानंतर निळे फेटे बांधून वंचित बहुजन आघाडीचे 4 नगरसेवकांचे आगमन झाले. नवीन ओबेरॉय हे एकटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक एकटे दाखल झाले.
शिवसेना उबाठाचे 6 नगरसेवक भगवा रुमाल घालून सर्वात शेवटी आगमन झाले. आले होते. यावेळी पोलीसांनी चारही बाजूचे रस्ते वाहतूकीसाठी बंद केले होते.
महापालिका शाळेतील मुलांच्या बॅण्ड पथकाने विविध गाणी वाजवित नवनियुक्त नगरसेवकांचे स्वागत केले.
या निवडणुकीनिमित्त पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कराड, आमदार संजय केणेकर, नारायण कुचे, शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिवसेना निरीक्षक विलास पारकर आदींसह पदाधिकाऱ्यांनीही आवर्जून महापालिकेत हजेरी लावली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे मुख्यालयाबाहेर येवून चक्कर मारुन गेले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे नगरसेवक सतिंदरसिंग (नविन) ओबेरॉय हे शिवसेना शिंदे गटातील नगरसेवकांसोबत सभागृहात बसले होते. मात्र मतदानावेळी त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केलेल्या नगरसेवकांनी आपला अहवाल द्यावा, अन्यथा आपले नगरसेवक पद रद्द होईल, असा सूचनावजा इशाराही यावेळी महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला.
जंजाळ यांच्या समर्थकांचा दोन ट्रक गुलाल उधळून जल्लोष आणि पोस्टरबाजी करत कोणाला दिला इशारा...
उपमहापौर पदासाठी विजय झाल्यानंतर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थकांनी मुख्यालयाबाहेर एकच जल्लोष केला. दोन ट्रक गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत हातात पोस्टर झळकावून कोणाला इशारा दिला अशी चर्चा यावेळी सुरू होती. "कम बॅक", "जिस्का गुरु बलवान उसका चेला पैलवान" "मोठं मोठे गार केले" हा मजकूर लिहलेले पोस्टर झळकावून कार्यकर्त्यांनी कोणाला इशारा दिला अशी चर्चा महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर सुरू होती.
महापौर पदाची धुरा सांभाळल्यानंतर समीर राजूरकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आशिर्वाद घेतले. व आभार मानत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. शहराच्या विकासावर चर्चा केली. या आनंदमयी वातावरणात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंत्री अतुल सावे, खासदार डॉ भागवत कराड, आमदार संजय केनेकर, आमदार नारायण कुचे, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, बापू घडामोडे व इतर भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?