अट्टल चोरट्यांच्या टोळीचा ग्रामीण गुन्हे शाखेने केला पर्दाफाश...
अट्टल चोरट्यांच्या टोळीचा ग्रामीण गुन्हे शाखेने केला पर्दाफाश...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज):- करमाड परिसरात घरफोड्या करून दहशत माजवणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीचा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत 5 जणांना जेरबंद केले. तर या प्रकरणातील आणखी तिघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह 1 लाख 82 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती
दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी करमाड हद्दीतील मौजे कुंभेफळ येथील न्यू श्रीराम इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक या दुकानाचे लोखंडी पत्रे उचकटून चोरट्यांनी घरफोडी केली होती. दुकानातून इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण 1,82,900 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याबाबत संदीप विनायक मुळे (वय 40, रा. शेंद्रा फाटा) यांनी करमाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की चोरीला गेलेला मुद्देमाल MH- 17 BY-8260 या महिंद्रा बोलेरो पिकअपमधून प्रवरा संगमकडे नेला जाणार आहे. त्यानुसार पथकाने सुंदरवाडी शिवारातील साई मंदिराजवळ सापळा रचून वाहन अडवले. तपासात वाहनातून चोरीचा मुद्देमाल आणि चोरीत वापरलेली साधने आढळून आली.
या घटनेतील मनोज सुनिल लिभोरे (वय 21), संतोष अशोक जाधव (वय 27),
सुहास रामकिसन धोत्रे (वय 28), धर्मेंद्र मांजीलाल गुंगले (वय 24), अजय अनिल गायकवाड (वय 18) या पाच आरोपिंना पोलिसांनी अटक केली आहे.
तर त्यांच्या अन्य तीन साथीदार आरोपी– प्रविण काळे उर्फ गह्या, प्रताप (नेवासा), अजय पल्हाळे हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
चौकशीत या टोळीने फुलंब्री, विरगाव आणि वैजापूर पोलीस ठाणे हद्दीतही घरफोड्या केल्याची कबुली दिली. एकूण 4 गुन्ह्यांचा उलगडा या कारवाईत झाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनायकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक अनुपर्णा सिंह यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकात पी.बी. पाटील, सुनील गोरे, कासिम शेख, बलवीरसिंग बहुरे व योगेश तरमाळे यांचा समावेश होता.
What's Your Reaction?