उद्योगपती लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणा-या आरोपिचे एन्काऊंटर, पाच आरोपी अटक...
 
                                उद्योगपती लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या आरोपीचे एन्काऊंटर
साजापूर परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
 
एमआयडीसी वाळूज परिसरातील उद्योगपती लड्डा यांच्या बंगल्यावर दरोडा घालून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा जवळपास कोट्यावधी रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर पोलिसांनी केले. 15 मे रोजी बजाजनगर येथील संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर दरोडा टाकून साडेपाच किलो सोने, 32 किलो चांदिची भांडी, 70 हजार रुपये रोख, एक मोबाईल असा एकूण 3,46,75000 रुपये किमतीचा ऐवज चोरी केला होता. वाळूज एमआयडिसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
एन्काऊंटरची ही घटना सोमवारी, 26 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी परिसरातील साजापूर येथे घडली. दरम्यान अमोल बाबुराव खोतकर याच्यासह चार ते पाच साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल बाबुराव खोतकर, रा. साजापूर, वडगाव कोल्हाटी परिसर असे एन्काऊंटर मध्ये ठार झालेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. बजाजनगर येथील उद्योगपती लड्डा यांच्या घरावर दरोडा घालणाऱ्या टोळीचा मुख्य असलेला अमोल खोतकर हा वडगाव कोल्हाटी परिसरातील साजापूर येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे एक पथक सोमवारी रात्रीच्या सुमारास अमोल खोतकर याला अटक करण्यासाठी साजापूर येथे गेले होते. पोलीस आल्याची चाहूल लागताच अमोल खोतकर यांने आपल्या चार चाकी वाहनाने पळून जाण्याचा प्रयत्न करीत पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला रोखण्यासाठी केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर हा गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. खोतकर याच्यावर शहरातील दहा पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्यातील आरोपी योगेश सुभाष हाजवे, वय 31, रा.गंगोत्री पार्क, वडगाव कोल्हाटी, छत्रपती संभाजिनगर, सुरेश उर्फ सुर्यकांत रामकिसन गंगणे, वय 45, रा.कुत्तरविहिर, अंबाजोगाई, बीड, सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन, वय 37, रा.ओमसाईनगर, रांजनगाव(शेपू), या.गंगापूर, सोहेल जलिल शेख, वय 22, करबला बेस, अंबेजोगाई, जि.बीड, महेंद्र माधवराव बिडवे, वय 38, रा.साजापूर, छत्रपती संभाजिनगर यांना ताब्यात घेतले आहे. अमोल बाबुराव खोतकर, राहणार पडेगाव याचा एन्काऊंटर झाल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी दिली आहे.
पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप गुरमे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, रवी गच्चे, सहायक पोलिस निरीक्षक, मनोज शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे MIDC वाळूज, विनायक शेळके, सहायक पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, काशीनाथ महांडुळे, संदीप साळुंके, पोलिस उपनिरीक्षक, विशाल बोडखे, पोलिस उपनिरीक्षक, प्रविण वाघ, पोलिस उपनिरीक्षक, प्रविण पाथरकर, पोलिस उपनिरीक्षक, संदीप शिंदे, पोलिस उपनिरीक्षक या पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            