एक रील मातीसाठी...एक रील पाण्यासाठी... सुरक्षित भविष्यासाठी...!
एक रील मातीसाठी... एक रील पाण्यासाठी... सुरक्षित भविष्यासाठी...!
युवकांच्या कल्पकतेतून मृद व जलसंवर्धनाची डिजिटल लोकचळवळ...
माती आणि पाणी ही केवळ नैसर्गिक संसाधने नाहीत, तर मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा आणि शाश्वत विकासाचा मूलभूत आधार आहेत. सुपीक मातीचे संवर्धन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर ही आजच्या काळाची गरज बनली आहे. बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान, जमिनीची धूप आणि भूजल पातळीतील घट या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारणाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने युवकांच्या कल्पकतेला डिजिटल माध्यमाची जोड देत ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ या अभिनव राज्यव्यापी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
जलसंधारण सप्ताहातून लोकचळवळीचा जागर...
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो. यंदा 15 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राज्यभर ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’, जलसंधारणाची शपथ आणि जनजागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांना नव्या पिढीच्या सहभागाची जोड देण्यासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आजच्या युवकांसाठी Instagram सारखी समाजमाध्यमे अभिव्यक्तीचे प्रभावी व्यासपीठ बनली आहेत. त्याच माध्यमाचा सकारात्मक आणि समाजोपयोगी वापर करून माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
30 ते 60 सेकंदांत द्यायचा संवर्धनाचा संदेश...
महाराष्ट्रातील 15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांनी मृद व जलसंधारणाशी संबंधित विषयावर 30 ते 60 सेकंदांची Instagram Reel तयार करायची आहे. रीलच्या सुरुवातीला तिचा उद्देश, स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. तयार केलेली रील स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करून मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे आवश्यक आहे. त्यासोबत #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे.
कल्पकतेला विषयांचे विस्तृत आकाश...
माती संवर्धन आणि पाणी बचत या संकल्पनेला विविध अंगांनी मांडण्याची संधी या स्पर्धेत युवकांना मिळणार आहे. मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक संवर्धन पद्धती तसेच माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना अशा विविध विषयांवर रील तयार करता येईल.
यामुळे केवळ स्पर्धाच होणार नाही, तर राज्यातील विविध भागांत राबविण्यात आलेली यशस्वी कामे, स्थानिक प्रयोग आणि पारंपरिक ज्ञानदेखील डिजिटल माध्यमातून समाजासमोर येण्यास मदत होणार आहे.
लाईक्स’पेक्षा आशय आणि सामाजिक संदेशाला महत्त्व...
सोशल मीडियावरील स्पर्धा म्हटली की Likes आणि Followers यांना अधिक महत्त्व दिले जाते. मात्र या स्पर्धेत आशय, कल्पकता आणि सामाजिक संदेशाला प्राधान्य देण्यात आले आहे. स्पर्धेचे मूल्यमापन एकूण 100 गुणांमध्ये करण्यात येणार आहे. विषय व संदेशासाठी 30 गुण, कल्पकतेसाठी 25 गुण, प्रभावी सामाजिक संदेशासाठी 20 गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्तेसाठी 15 गुण आणि Instagram Engagement साठी 10 गुण निश्चित करण्यात आले आहेत.
त्यामुळे केवळ Likes किंवा Followers च्या संख्येवर विजेता ठरणार नाही. तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement यांचा समतोल साधून गुणवत्तापूर्ण रील्सची निवड केली जाणार आहे.
विजेत्यांना पुरस्कार; मिळणार ‘युवा मृद-जलदूत’ची ओळख...
युवकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर आकर्षक पुरस्कार प्रस्तावित करण्यात आले आहेत. प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रुपये व गौरवचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार रुपये व गौरवचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांना विशेष ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून गौरविण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून किमान 250 रील्स आणि संपूर्ण राज्यातून 10 हजार रील्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हजारो युवकांनी या उपक्रमात सहभाग घेतल्यास समाजमाध्यमांद्वारे लाखो नागरिकांपर्यंत माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचू शकतो.
आजचे संवर्धन म्हणजे उद्याची सुरक्षितता
पाण्याचा प्रत्येक थेंब आणि मातीचा प्रत्येक कण भावी पिढ्यांसाठी जपणे ही सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या योजना आणि जलसंधारणाची कामे यांना लोकसहभागाची जोड मिळाल्यासच त्यांचे परिणाम अधिक व्यापक आणि शाश्वत होऊ शकतात. विशेषतः युवकांनी या चळवळीचे दूत बनणे ही काळाची गरज आहे.
मोबाईलच्या पडद्यावर काही सेकंद दिसणारी एखादी कल्पक रील एखाद्या व्यक्तीला पाणी वाचविण्यास, पावसाचे पाणी साठविण्यास, वृक्ष लावण्यास किंवा आपल्या गावातील जलसंधारणाच्या कामात सहभागी होण्यास प्रेरित करू शकते. त्यामुळे ही स्पर्धा केवळ डिजिटल कंटेंट निर्मितीपुरती मर्यादित नसून ‘डिजिटल जनजागृतीतून प्रत्यक्ष लोकसहभागाकडे’ नेणारा अभिनव प्रयत्न आहे.
“एक Reel... मातीसाठी!
एक Reel... पाण्यासाठी!
एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी!”
या संदेशातून युवकांनी आपल्या कल्पकतेला समाजहिताची दिशा देत माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा. कारण आज वाचवलेली माती आणि पाणी हेच उद्याच्या समृद्ध, सक्षम आणि जलसुरक्षित महाराष्ट्राचे भक्कम अधिष्ठान ठरणार आहे.
—संकलन जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
What's Your Reaction?