कन्नड...तरुण मित्राचा धड शिरावेगळे करुन निर्घृण खून करणारा गजाआड...

 0
कन्नड...तरुण मित्राचा धड शिरावेगळे करुन निर्घृण खून करणारा गजाआड...

तरुण मित्राचा धड शिरावेगळे करुन निर्घृण खून करणारा गजाआड...

ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने आवळल्या मुसक्या...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - कन्नडच्या गौताळा अभयारण्यात 

मित्राचा कु-हाडीने गळा कापून जीवे मारल्यानंतर त्याचे मुंडके धडापासून वेगळे करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मारेकऱ्याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी शिताफीने गजाआड केले. निखिल हिरामण सूर्यवंशी उर्फ लगड उर्फ पाटील उर्फ सुरसे (28 वर्ष), राहणार सिंदी तालूका चाळीसगाव जिल्हा जळगांव असे मयत तरुणाचे नाव आहे. तर श्रावण ज्ञानेश्वर धनगर (वय 27 वर्ष), राहणार शिंदी तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगांव असे मारेकऱ्याचे नाव असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौताळा अभयारण्य परिसरातील सायगव्हाण शिवारातील गट नंबर 75 मध्ये असलेल्या सनसेट पॉईन्ट जवळील घनदाट जंगलात 3 सप्टेंबर रोजी पोलिसांना धडापासून मुंडके वेगळे करुन टाकलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा 4 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे, पवन इंगळे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून मयत तरुणाच्या नातेवाईकांचा शोध घेतला. मयत तरुण जळगांवच्या चाळीसगाव तालुक्यातील सिंदी गावाचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याचे नाव निखिल हिरामण सूर्यवंशी उर्फ लगड उर्फ पाटील उर्फ सुरसे असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, मयत निखील सूर्यवंशी हा तरुण रोजंदारीवर धुमस चालविण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली. श्रावण धनगर हा त्याचा जवळचा मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

पोलिसांनी श्रावण धनगर याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने सांगितले की, 26 ऑगस्ट रोजी निखिल सूर्यवंशी आणि श्रावण धनगर हे दोघेही दुचाकीवर सायगाव मार्गे सनसेट पॉईट जवळ आले. त्यावेळी निखिल हा श्रावणला म्हणाला की, मी चोऱ्या करतो, गुंडगिरी करतो, दारु पितो, माझे सर्व लफडी तुला माहित आहेत, तुझ्यामुळे माझी गावात बदनामी होत आहे. तु मेला तर माझ्या सर्व अडचणी दुर होवून माझे लग्न होईल असे म्हणत निखिल याने श्रावण याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी श्रावण याने त्याच्या गुप्तांगावर लाथ मारल्यानंतर निखिल खाली कोसळला. निखिल खाली कोसळताच श्रावण याने त्याच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेत त्याच्या मानेवर वार करुन शिर धडावेगळे करुन खून केल्याची कबूली दिली. आरोपी श्रावण धनकर याला पुढील तपासासाठी कन्नड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow