कायद्याचे पालन करा, दादागिरी सहन करणार नाही - विनोद पाटील

 0
कायद्याचे पालन करा, दादागिरी सहन करणार नाही - विनोद पाटील

कायद्याचे पालन करा, दादागिरी सहन करणार नाही - विनोद पाटील

हर्सूल येथील बैठकीतील सूर : मुस्लिम धर्मगुरु, मस्जिद, कब्रस्तान कमिटीचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती, युनुस पटेल यांनी आयुक्तांवर व्यक्त केला राग, गावात भांडण लावण्याचा केला आरोप... 

छत्रपती संभाजीनगर :

शहराच्या विकासाला विरोध नाही परंतु रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाईत मालमत्ताधारकांवर अन्याय करु नका, कोणाला बेघर करुन कसे चालेल. शहराच्या विकास करताना आधी नागरिकांशी चर्चा करावी. कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून जागा घेण्याचे आदेश न्यायालयानेही दिलेले आहेत. मात्र मनपा आयुक्त दादागिरीची भाषा करत असून, त्यांची दादागिरी आम्ही सहन करणार नाही. आपण सर्वांनी संघटित राहून कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे, असा सूर हर्सूल येथील मुस्लिम मस्जिद कब्रस्तान कमिटीच्या बैठकीत उमटला. सोमवारी सकाळी हर्सूलमधील दर्ग्यातील मैदानात झालेल्या बैठकीला माजी नगरसेवक युनूस पटेल, विनोद पाटील, धर्मगुरू मुफ्ती नईम कासमी, ॲड.नासेर पटेल, फारुख पटेल, रशीद पटेल, मुस्लिम धर्मगुरु, मशिदीचे इमाम, मशिद व कब्रस्तान कमिटीचे पदाधिकारी, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी मंदिर, मस्जिद आणि कब्रस्तानला अचानक नोटिस दिली. जागा रिकामी करा, अशी सूचना मनपा प्रशासनाने केली आहे. हर्सूलमध्ये चारशे वर्षे जुनी ऐतेहासिक मस्जिद आहे. रस्ता रूंदीकरण करण्यासाठी जागा ताब्यात घेण्यासाठी मनपा आयुक्त दहशत निर्माण करत आहेत. हा रस्ता दोनशे फुटांचा होणार आहे. त्यांच्या या भूमिकेविरोधात न्यायालयात दाद मागू, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला. विनोद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत आहे. एक अधिकारी दादागिरीची भाषा करत आहे. हर्सूलमधील काही लोकांनी न्यायालयात दाद मागितली असता, न्यायालयाने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करण्याचे आदेश दिलेले आहेत. पंचनामा झाला पाहिजे. संबंधित मालमत्ताधारकांना नोटिस दिली पाहिजे, मात्र आज धार्मिकस्थळ वगळता एकालाही नोटिस दिलेली नाही. नागरिकांशी चर्चा केली नाही. भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडल्यानंतरच कारवाई करता येते. तसा कायदा आहे. महापालिकेने रस्त्यासाठी 2 वर्षांपूर्वी जागा घेतली आहे. मात्र त्यावर अद्यापही रस्ता केलेला नाही. याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. 

आपल्याला रस्त्यावर उतरून महापालिकेला प्रश्न विचारावे लागतील. नोटिस दिली का, प्रक्रियेचा अवलंब करत आहात का, ज्या विकास आराखड्यानुसार रस्ता केला जात आहे, तो आराखडा सरकारकडेच पडून आहे, त्याला अद्याप मंजुरी दिलेली नाही. दादागिरीची भाषा करू नका. दादागिरी आम्ही सहन करणार नाही. हे आमचे शहर आहे, दादागिरी तर आम्ही करू. असेही पाटील यांनी ठणकावून सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow