गणेश विसर्जन व्यवस्थेची मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी केली पाहणी

 0
गणेश विसर्जन व्यवस्थेची मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी केली पाहणी

गणेश विसर्जन व्यवस्थेची आयुक्त अमोल येडगे यांनी केली पाहणी

जास्तीत जास्त प्रमाणात मुर्तीदान संकलन केंद्रावर मूर्ती देण्याचे आवाहन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- गणेशोत्सव आणि गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी आज शहरातील विविध विसर्जन विहिरी व कृत्रिम तलावांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

विसर्जनस्थळी नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुरेशी प्रकाश व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच नागरिकांना जवळचे मुर्तीदान संकलन केंद्र, विसर्जनस्थळ सहज उपलब्ध व्हावे, यासाठी क्यूआर कोड तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर नागरिकांना जवळचे मुर्तीदान संकलन केंद्र, विसर्जन स्थळ सहज उपलब्ध व्हावे यासाठी क्युआर कोड तयार करण्याचे निर्देश दिले.

महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी एकूण 47 मूर्तीदान संकलन केंद्रे उभारण्यात येत आहेत. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जास्तीत जास्त प्रमाणात गणेशमूर्ती, मूर्तीदान संकलन केंद्रांवर जमा कराव्यात, असे आवाहन आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी केले.

मूर्तीदान संकलन केंद्रावर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या श्री गणेशमूर्तींचे विधिवत पूजन करून औपचारिक विसर्जन करण्यात येईल. त्यानंतर या मूर्ती मूर्तिकारांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

आयुक्तांनी आजच्या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद मैदान येथील विसर्जन विहीर, संभाजी पेठ, एन-12 येथील विसर्जन विहीर, राजीव गांधी स्टेडियम येथील कृत्रिम तलाव, शिवाजीनगर येथील विसर्जन विहीर तसेच देवळाई तलाव या विविध विसर्जनस्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता संजय कोंबडे, अतिरिक्त शहर अभियंता अमोल कुलकर्णी यांच्यासह संबंधित अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow