गाडी दोरीने ओढून काँग्रेसचे इंधन दरवाढ विरोधात अनोखे आंदोलन...!

 0
गाडी दोरीने ओढून काँग्रेसचे इंधन दरवाढ विरोधात अनोखे आंदोलन...!

पेट्रोल-डिझेल दरवाढ व टंचाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर, दरवाढ मागे घेण्यासाठी क्रांतीचौकात आंदोलन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- पेट्रोल व डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेवर महागाईचा मोठा बोजा पडत असून, सरकारने तातडीने इंधन दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी क्रांतीचौकात नवनियुक्त काँग्रेसचे शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली पहीले आंदोलनात कार्यकर्ते अक्रामक झाले होते.

इंधनाची दरवाढ मागे घ्यावी व शेतकऱ्यांचे शेतीचे मशागतीचे काम सुरू आहे त्यांना डिझेलची टंचाई भासू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात संबंधित प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मागील काही दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 8 रुपयांची वाढ झाली असून, आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेच्या अडचणीत भर पडली आहे. गेल्या 12 वर्षांत पेट्रोलच्या किमतीत सुमारे 38 टक्के तर डिझेलच्या किमतीत 62 टक्क्यांनी वाढ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळवला असून, तेल कंपन्यांनीही दरवाढीतून मोठा नफा कमावल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या वाढीचा परिणाम केवळ इंधनापुरता मर्यादित न राहता जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण झाले असल्याचे नमूद करण्यात आले.

राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शेतीकामासाठी ट्रॅक्टरसह विविध यंत्रसामग्रीसाठी डिझेलची आवश्यकता असते. त्यामुळे डिझेलचा सुरळीत पुरवठा तातडीने सुरू करून दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आज क्रांती चौक येथे छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावर वाढीच्या निषेधार्थ गाडी ओढून पेट्रोल पंपावर जात जोरदार आंदोलन - निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हाध्यक्ष ऍड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

यावेळी “मोदी सरकार हाय हाय”, “होश में आओ, होश में आओ मोदी सरकार” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी तसेच छोटे व्यावसायिक यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.

या वेळी माजी शहर अध्यक्ष शेख युसुफ, एड एबलसिंग गिल, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, दिपाली मिसाळ, डॉ. पवन डोंगरे, हकीम पटेल, उमाकांत खोतकर, डॉ. निलेश आंबेवाडीकर, शेख कैसर बाबा, कल्याण चव्हाण सर, जयपाल दावणे, योगेश थोरात, अनिता भंडारी, विशाल बनस्वाल, आबेद पठाण, मुदस्सीर अन्सारी, सय्यद जाकीर, शीला मगरे, सुरेश पवार, मोईन कुरेशी, शफीक शहा आदी उपस्थित होते. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमती तात्काळ कमी कराव्यात, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow