चंपा चौक ते जालना रोड रस्ता रुंदीकरण, बाधितांनी केली निदर्शने...

चंपा चौक ते जालना रोड रस्ता रुंदीकरण, बाधितांनी केली निदर्शने
भवानी नगर, दादा काॅलनी, दत्त नगर, कैलास नगर येथील नागरीकांची बैठक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - चंपाचौक ते जालना रोडपर्यंतचा हा रस्ता 60 मीटर(100 फुट) रुंद करण्यात येणार आहे. या रस्ता रुंदीकरणामुळे भवानीनगर, जुना मोंढा, दादा कॉलनी, दत्त नगर या भागातील सुमारे 900 निवासी व व्यावसायिक मालमत्ता बाधित होणार आहे याआधी आम्हाला घर द्यावे, नंतरच आमची घरे पाडावीत, अशी मागणी आज नागरिकांनी जुना मोंढा येथील बाथ्रीतेली मंगल कार्यालयातील बैठकीत केली. बैठकीनंतर नागरिकांनी मनपा आयुक्त व सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली.
शुक्रवारी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी चंपा चौक येथे बैठक घेत, रस्ता रुंद करण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर या भागातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भिती आणि चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बैठक घेत चर्चा केली. चंपाचौक ते जालना रोडच्या रस्ता 30 मिटरचा आहे, नवीन शहर विकास आराखड्यात तो 18 मिटरचा दाखविण्यात आला आहे. त्यामुळे मोठा रस्ता नको, विकास आराखड्यात आहे त्याप्रमाणेच रस्ता करावा, गरिबांची घरे वाचवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र महापालिकेने चंपाचौक ते जालना रोडपर्यंत शंभर फुट रुंद रस्त्यासाठी मोजणी करून अनेक मालमत्ताधारकांना टीडीआर स्वरुपात मोबदला दिलेला आहे. जुन्या विकास आराखड्यातील अलाईनमेंटनुसारच हा रस्ता करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केलेले आहे. या रस्त्यात बाधित होणाऱ्या सुमारे 900 मालमत्तांवर हातोडा पडणार असून, लवकरच कारवाई होण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. बैठकीनंतर महीलांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. पदराने ती अश्रू पूसून मन मोकळे करत होती.
या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांनी बाथ्रीतेली मंगल कार्यालयात बैठक घेतली. बैठकीनंतर महीलांच्या डोळ्यात अश्रू आले पदराने अश्रू पुसत त्या मन मोकळे करत होत्या. आम्ही 70 वर्षांपासून या भागात राहत असून घाम गाळून मोठ्या कष्टाने घरे बांधली आहेत. आपल्या आयुष्यभराची कमाई त्यात टाकली आहे. आता रुंदीकरणात आमची घरे पाडण्यात येणार आहेत. हा अन्याय असून, आधी आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. महापालिका आयुक्तांनी गरीबांवर अन्याय करणारी ही बुलडोजर संस्कृती थांबवावी. आमचे पुनर्वसन केल्याशिवाय कोणाचेही घर पाडू नका, अशी मागणी नागरिकांनी केली.
रस्त्याची अलाईनमेंट बदलल्यास आमची घरे वाचू शकतात. महापालिका प्रशासनाने पर्यायी मार्गाचा विचार करावा. हॉटेल अजमेराकडून रस्ता नेल्यास शेकडो सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असा पर्यायही नागरिकांनी दिला. मात्र महापालिका आमची घरे पाडत आहे, असा आरोपही नागरिकांनी केला. तसेच निवडणुकीच्या वेळी आमच्या दारात येवून मतांची भीक मागणारे नेते आता कुठे गेलेत...?, असा सवालही नागरिकांनी यावेळी बैठकीत उपस्थित केला.
What's Your Reaction?






