जालना रोडवर मध्यरात्री एका युवकाचा धारदार शस्त्राने खून, लूटमारीची घटना...!

 0
जालना रोडवर मध्यरात्री एका युवकाचा धारदार शस्त्राने खून, लूटमारीची घटना...!

जालना रोडवर धारदार शस्त्राने खून, शहरात खळबळ 

मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास घडली घटना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - शहरातील मुख्य अन व्हिआयपी समजल्या जाणाऱ्या जालना रोडवर मध्यरात्री एका युवकार धारदार शस्त्राने वार करण्यात आले. चोरट्यांनी लूटमार करीत मोबाईलसह पैसेही हिसकावले. विरोध करताच धारदार शस्त्राने मांडीवर वार केला. या हल्ल्याने तो जागीच कोसळला अन अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. अब्दूल बासितखान हकीमखान (वय 45) राहणार कैसर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. 24 तास वाहतूक असलेल्या या रोडवर घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती जालना रोडने पायी येत होता. एसएफसमोरील अपेक्स हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रोडवरील कॉर्नरवर आला असता त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर अज्ञाताने डायल 112 ला फोन करून माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलिस आले आणि रिक्षाने त्याला घाटी रूग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून जालना रोडवरील सीसिटिव्ही तपासले जात आहेत. घटनास्थळी फाॅरेन्सिक टिमने नमूने घेतले. 

सकाळीच कळली माहिती...

दरम्यान, मयत अब्दूल बासितखान हकीमखान यांच्या कुटूंबीयांना सकाळी घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर कुटूंबियांनी घाटी रूग्णालयात धाव घेतली. जिन्सी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेले त्यांचे भाऊ वाजेदखान यांनी सांगितले की, अब्दुल बासित यांना 4 मुले आहेत. त्यात सर्वात लहान 5 वर्षाची दोन मुले जुळी आहेत. ते भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करीत होते. गावावरून परत येताना ही घटना घडली. यामुळे कुटूंबाला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगताना त्यांना रडू कोसळले.

शहरात लुटमारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. पायी जाणाऱ्यांना अडवून लूटणे, मंगळसुत्र हिसकावण्याच्या घटना रोज घडत आहेत. तर या आठवड्यातील ही खुनाची तिसरी घटना आहे. कालच छावणीतील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकावरच चाकूहल्ला केला. तर दोन दिवसांपुर्वीच कांचनवाडीत मित्राचे डोके झाडावर आपटून खून करण्यात आला होता. गुन्ह्यांच्या या घटना शहरवासियांची झोप उडविणाऱ्याच आहेत.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी...

दरम्यान, जालना रोडसारख्या मुख्य रस्त्यावर खून झाल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलिस आयुक्त मनोज पगारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर जिन्सी ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश ताठे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गंभीरराव यांनी जालना रोडवरील घटनास्थळी ठाण मांडून होते. जालना रोडवर पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहून वाहनधारकही वेग कमी करून जात होते. त्यामुळे काही काळ याठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.

परिसरातील सीसिटिव्हीची तपासणी...

पोलिसांनी जालना रोडवरील या भागातील सीसिटिव्हीची तपासणी सुरू केली आहे. माहितीनुसार मयत बाफना ज्वेलर्सकडून जालना रोडने पायी जाताना दिसून आला. इतर सीसिटिव्हीची तपासणीही पोलिसांनी सुरू केली आहे. तर फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.

आरोपी लवकरच पकडू - डीसीपी रत्नाकर नवले

रात्री उशीरा ही घटना घडली असून पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या आदेशाने मी स्वतः या तपासाकडे लक्ष ठेवून आहे. या भागातील सीसिटिव्ही फुटेज हस्तगत केले जात आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकेही तयार केली असून आरोपीचा शोध सुरू केला आहे, असे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow