जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा समर्थकांसह भाजपात प्रवेश...

 0
जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा समर्थकांसह भाजपात प्रवेश...

‘50 खोके एकदम ओके’ म्हणणारेच आता भाजपमध्ये...! कैलास गोरंट्यालांचा धक्कादायक प्रवेश...आगामी महापालिका निवडणुकीत रंगत वाढणार...खोतकर व गोरंट्यालांचे राजकारण सुरु...

मुंबई, दि.31(डि-24 न्यूज) - "50 खोके एकदम ओके’ या राजकीय वादळी विधानाचे जनक ठरलेले आणि जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भारतीय जनता पक्षात मुंबईत जाहिर प्रवेश केला. 

मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरंट्याल यांनी भाजपाचा भगवा झेंडा हाती घेतला. यावेळी राज्यसभा खासदार अशोक चव्हाण, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार संजय केनेकर, आमदार नारायण कुचे आणि प्रदेश माध्यम समन्वयक नवनाथ बन उपस्थित होते.

गोरंट्याल यांच्यासोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनीही काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश सोहळ्याला ‘शक्तीप्रदर्शन’चे स्वरूप आले होते.

गोरंट्याल यांनी मागील काही महिन्यांपासून काँग्रेसपासून दूर राहून स्वतंत्र भूमिका घेण्यास सुरुवात केली होती. त्यांचे भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच अनेकांनी त्याच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र आता त्यांनी अधिकृतरित्या भाजपा प्रवेश करत आपल्या राजकीय भवितव्यासाठी नवा अध्याय सुरू केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत परिणाम दिसून येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यापूर्वी विधानसभेतील '50 खोके एकदम ओके' या वाक्यामुळे त्यांची महाराष्ट्रभर चर्चा झाली होती. याच विधानाचा वापर करून ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे ‘त्या’ वाक्याचा जनक असलेले गोरंट्याल हेच आता भाजपमध्ये गेल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

भाजपने मराठवाड्यातील राजकारणात नव्या घडामोडींना चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. आता गोरंट्याल यांना पक्षात नेमकी काय भूमिका दिली जाते आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow