जिल्ह्याचे नियोजन करताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न- पालकमंत्री अब्दुल सत्तार
 
                                जिल्हा नियोजन समितीची बैठक...
जिल्ह्याचे नियोजन करतांना प्रत्येक घटकाला
न्याय देण्याचा प्रयत्न- पालकमंत्री अब्दुल सत्तार
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.3(डि-24 न्यूज) जिल्ह्याचे नियोजन करतांना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच शिक्षण व आरोग्य या सेवांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे पणन वअल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी दिलेल्या निधीचा विनियोग काटेकोरपणे करुन शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवावा,असे निर्देशही पालकमंत्री सत्तार यांनी दिले. यावेळी सन २०२४-२५ साठी ७७३ कोटी ९० लक्ष रुपयांच्या नियतव्ययास मंजूरीही देण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक आज नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री अब्दुल सत्तार हे होते. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, लोकसभा सदस्य खासदार कल्याण काळे, विधानसभा सदस्य आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंह राजपूत, आ. प्रशांत बंब तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच सर्व यंत्रणाप्रमुख आदी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी यापुर्वीच्या बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुपालन अहवालावर चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आली. तसेच गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या ६७२ कोटी ११ लक्ष ३७ हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. त्यानंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी नियतव्यय सादर करण्यात आला. त्यात सर्वसाधारण योजनांसाठी ६६० कोटी रुपये, विशेष घटक योजनांसाठी १०४ कोटी रुपये तर आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रासाठी ९ कोटी ९० लक्ष रुपये अशा एकूण ७७३ कोटी ९० लक्ष रुपयांच्या नियतव्ययास मान्यता देण्यात आली.
पालकमंत्री सत्तार म्हणाले की, शिक्षण आणि आरोग्य या घटकांसाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच जिल्ह्याचे नियोजन करतांना सर्व घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंत्रणांनी सर्व कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करावी. तसे न झाल्यास जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
नियोजन समितीच्या झालेल्या चर्चेत खासदार कल्याण काळे, उपस्थित सर्व आमदार, सदस्य यांनी सहभाग घेऊन मौलिक सुचना मांडल्या. जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी नियोजन आराखड्याचे सादरीकरण केले व उपस्थितांचे आभार मानले.
महिला व बालविकास विभागामार्फत गर्भलिंगनिदान विरोधात जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून माझी मुलगी या कवितेचे जनजागृती पोस्टर विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            