झाडांना इजा कराल तर कारवाईला सामोरे जा...मनपा प्रशासनाचा इशारा...

 0
झाडांना इजा कराल तर कारवाईला सामोरे जा...मनपा प्रशासनाचा इशारा...

झाडांना इजा कराल तर कारवाईला सामोरे जा प्रशासनाचा इशारा...

पर्यावरणाचे रक्षण करून आपले शहर हिरवेगार व प्रदूषणमुक्त ठेवण्याचे आवाहन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- शहरातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि वृक्षांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व मुख्य उद्यान अधिक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने "खिळे मुक्त झाडं...वेदना मुक्त निसर्ग" ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील विविध मुख्य रस्त्यांच्या कडेला झाडांच्या खोडावर खिळे ठोकून जाहिरात फलक ,बोर्ड आणि लायटिंग लावल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच झाडावरून इंटरनेटची वायर ओढणे, सर्विस वायर टाकणे इत्यादी मुळे झाडांना मोठ्या प्रमाणावर इजा पोहचत आहे. यामुळे त्यांची वाढ खुंटत आहे.

झाडांमध्ये खिळे ठोकल्याने किड लागून झाड आतून पोखरले जाते आणि कालांतराने वाळून जाते. यामुळे वादळी वाऱ्यामुळे हे वृक्ष उन्मळून पडून कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 झाडांवर गुंडाळलेल्या सिरीयल लाइट्स मुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने झाडांच्या वाढीवर आणि रात्रीच्या वेळी पक्षांच्या निवाऱ्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

 उद्यान विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या "खिळे मुक्त झाडं...वेदना मुक्त निसर्ग" या मोहिमेला सुरुवात झाली असून या मोहिमेत आतापर्यंत जवळपास 150 झाडांना खिळे व तारांपासून मुक्त करण्यात आले आहे.

तरीही अद्याप बऱ्याच ठिकाणी,नागरिक ,संस्था ,आस्थापना यांनी झाडांना इजा पोहचविण्या साठी खिळे ,बोर्ड आणि लाईट्स केबल्स लावल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 व महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम 1995 या कायद्यांतर्गत झाडांना इजा पोहचविणे हा गुन्हा आहे. या कायद्या अंतर्गत अशा व्यक्ती ,संस्था ,आस्थापना यांचे विरुद्ध दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे.

तरी ज्या नागरिकांनी ,संस्था ,आस्थापना ,व्यापारी,जाहिरातदार यांनी झाडांवरील खिळे, बोर्ड, आणि लाईट्स केबल्स स्वतः हून सात दिवसांचे आत काढून घ्यावे व असे अनधिकृत कृत्ये थांबवावे व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण थांबवून पर्यावरणाचे रक्षण करणे व आपले शहर हिरवेगार आणि प्रदूषण मुक्त ठेवण्यास सहकार्य करावे अन्यथा अशा व्यक्ती, संस्था ,आस्थापना , व्यापारी, जाहिरातदार यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात झाडाआले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow