दहा स्विकृत नगरसेवकांचे पद धोक्यात...? नियुक्तीला आव्हान देत माजी नगरसेविकेची याचिका...!
दहा स्वीकृत नगरसेवकांचे पद धोक्यात...? नियुक्तीला न्यायालयात आव्हान...
भाजपच्या माजी नगरसेविका श्रीमती आशा बिनवडे यांची याचिका...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील पक्षनिहाय नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवकांच्या दहा नियुक्त्या आता न्यायालयीन वादात सापडल्या आहेत. या नियुक्त्यांविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका डॉ. आशा उत्तम बिनवडे यांनी निवडणूक याचिका (क्र. 20/2026) दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (कॉर्पोरेशन कोर्ट) एन. एच. तिखे यांनी सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. बिनवडे यांनी याचिकेत 24 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्र अधिसूचनेद्वारे झालेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. ही प्रक्रिया राबवताना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 तसेच पात्रता व नियुक्ती नियम 2012 मधील नियम 4 व 5 चे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.
या प्रकरणात तत्कालीन मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि नगरसचिव भोंबे यांच्यासह दहा नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयाने संबंधित सर्वांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्यानंतर या प्रकरणामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
भाजपच्या दहा वर्षे नगरसेविका राहिलेल्या डॉ. आशा बिनवडे यांनी स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज केला होता. पण मागील काही वर्षांपासून त्या पक्षसंघटनेत सक्रिय नसल्याचे कारण देत त्यांच्या अर्जाचा विचार न झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचे निकष पाळले गेले नाहीत, असा आक्षेप घेत त्यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली आहे.
What's Your Reaction?