एमआयएमच्या नगरसेवकावर कारवाई करण्याची भाजपची मागणी, पोलिस आयुक्तांना दिले निवेदन...!
एमआयएमच्या नगरसेवकावर कारवाईची भाजपची मागणी; किशोर शितोळेंचा पोलिस आयुक्तांना निवेदन पर पत्र
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) किशोर शितोळे यांनी नाशिक येथील कथित TCS धर्मांतर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी प्रभारी पोलिस आयुक्त पंकज अतुलकर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक येथील धर्मांतर प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान फरार असताना ती छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव परिसरात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या फ्लॅटवर पोलिसांना आढळून आली. त्यामुळे आरोपीला आश्रय दिल्याचा संशय अधिक बळावला असून, याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
किशोर शितोळे यांनी निवेदनात शहरातील वाढत्या अमली पदार्थ विक्री, तरुणांमध्ये वाढत असलेले व्यसन आणि गुन्हेगारी प्रवृत्तीबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली आहे. “शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या शक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
नाशिक पोलिस तपास करीत असले तरी, शहरातील पोलिसांनी संबंधित एमआयएमचे व्यक्ती, मोठे नेते यांच्या बाबतचा अधिकचा तपास करून नाशिक पोलिसांना स्वतःहून दिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच कथित “कॉर्पोरेट लव्ह जिहाद” आणि धर्मांतर रॅकेटमध्ये आणखी काही व्यक्ती व संघटनांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याचा आरोप करत, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना अटक करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
“यापूर्वीही शहरात राष्ट्रविरोधी कारवायांना पाठिंबा देणारे घटक समोर आले आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळीच रोखणे गरजेचे आहे,” असे ही किशोर शितोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मनपाचे सभागृह नेता अरविंद केंद्रे, भाजपाचे मंडळ अध्यक्ष सचिन गुगळे, पदाधिकारी किशोर मानकापे, शंकर अण्णा म्हात्रे, आनंद वाघ, सागर निळकंठ, योगेश वाणी उपस्थित होते.
What's Your Reaction?