देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणार मोदी सरकार जाणार - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
 
                                देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार मोदी सरकार जाणार-पृथ्वीराज चव्हाण
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) मतांचे होणारे विभाजन होणार नाही यासाठी देशातील भाजप विरोधी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडी बनवली. त्यामुळे बहुतांश ठिकाणी एकास एक उमेदवार दिल्याने लोकसभा निवडणुकीत थेट लढत होत आहे. तीन टप्प्यात झालेल्या मतदानावरून मोंदींच्या एनडीएला मतदारांनी नाकारले असून देशातील इंडिया आघाडीची एकजुटच भाजपाचा पराभव करणार आहे असा विश्वास कॉग्रेसचे जेष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील असेही त्यांनी सांगितले.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी कॉग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे दौर्यावर आले.
यावेळी मध्यवर्ती प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की देशाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. या निवडणूकीत विरोधी पक्षाच्या मताचे विभाजन टाळण्यासाठी देशात इंडिया आघाडी व महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करून राजकीय पक्षांची मोट बांधण्यात आली. काही तुरळक ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. इंडिया आघाडीच्या एकजुटीमुळे मताचे विभाजन टाळले जाणार असून एकास एक लढत पहायला मिळणार आहे. 2010 साली भाजपला केवळ 20 टक्के मते मिळाली होती. 2014 मध्ये भाजपचे नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आश्वासने दिल्यामुळे त्यांना 31 टक्के मते मिळाली. 2019 च्या निवडणूकीत भाजपला केवळ 6 टक्के जास्तीची मते मिळाली असलेतरी मोंदी यांनी दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. त्यावेळी पुलवामा घटनेमुळे सहानुभूती मिळाली होती अच्छे दिन आले नाही, जनधनच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये टाकले नाही, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली. त्यामुळे 70 टक्के मतदार आजही भाजपच्या विरोधात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
वंचितच्या उमेदवारांची भाजपाला मदत
राज्यात महाविकास आघाडी एकदिलाने व एका जोमाने ही निवडणूक लढवत आहे. वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी उमेदवार उभे करून मतविभाजनाद्वारे भाजपला मदत होणार असली तरी त्याचा फारसा फरक पडणार नाही. महाविकास आघाडीचा दणदणीत विजय होऊन सर्वाधिक उमेदवार निवडून येतील असा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला.
एकही राज्यात भाजप खासदारांची
संख्या वाढणार नाही...
देशातील सर्वच राज्यात भाजपच्या विरोधात सुप्तलाट निर्माण झाली आहे. 10 वर्षाच्या काळात नरेंद्र मोदी यांनी केवळ मतदारांना आश्वासने दिली. त्यातील एकही आश्वासन पूर्ण केली नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी मालाला हमी भाव, औद्योगिकरण या विषयावर नरेंद्र मोदी बोलायला तयार नाही. त्यामुळे एकही राज्यात भाजप खासदारांची संख्या वाढणार नाही. उलट भाजप खासदारांची संख्या कमी होईल, 200 पेक्षा अधिक जागा भाजपला मिळणार नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. आपल्या भाषणात हिंदू मुस्लिम, काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर बोलतात पण भाजपा काय करणार मोदी बोलत नाही.
देशाच्या अर्थ व्यवस्थेच्या नियोजनाचे अपयश
मोदीच्या चुकीच्या अर्थव्यवस्थेमुळे जीपीडीचा दर अत्यंत खाली घसरला आहे. 10 वर्षात जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर ठेवले नाही, महागाईला नियंत्रणात आणता आले नाही. बेरोजगारी प्रचंड वाढली. शेतकरी आर्थिक संकटात अडकला. अर्थ व्यवस्थेचे योग्य रितीने नियोजन करता आले नसल्याने हे प्रश्न असेच राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकरले
शेतकर्यांनी उत्पादीत केलेल्या कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली असलीतरी त्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकरण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी जरी कांद्याची निर्यात केली तरी त्यांना 40 टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. हे निर्यात शुल्क रद्द करावे, अशी मागणी शेतकरी पुत्र म्हणवणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
मोंदींनी शेतकर्यांवर सुड उगवला
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे आणले. हे कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकर्यांनी मोठे आंदोलन उभारले. या आंदोलनात सातशे शेतकर्यांनी बलिदान दिले. शेतकर्यांच्या विरोधापुढे मोंदींना माघार घ्यावी लागली. मोंदीकडून शेतकर्यावर सुड उगवला जात आहे. साखर, गहू, तांदुळ यावरील निर्यात बंदी उठवली नाही. कांद्यावर निर्यात बंदी आणली. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करून देण्याची घोषणा हवेत विरली. कापूस, सोयाबीन, तूर, धान पिकांना कवडीमोल भाव दिल्याने शेतकर्यांमध्ये मोंदीविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत असून हा संताप मतदानातून दिसून येत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
सरकार आले तर निवडणूक रोखे घोटळ्याची
एसआयटीमार्फत चौकशी करू...
नरेंद्र मोंदी यांनी निवडणूक रोखे काढून प्रचंड मोठा घोटाळा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे बेकायदेशीर ठरवून असंवैधानिक असल्याचे स्पष्ट केले आहे. देशात इंडीया आघाडीचे सरकार येताच निवडणूक रोखे घोटाळ्याची एसआयटी स्थापन करून त्यामार्फत चौकशी करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
मोदींच्या आशिर्वादाने महाराष्ट्रात
शिवसेना, राष्ट्रवादीत उभी फुट...
मोंदीच्या आशिर्वाद असल्यानेच महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पाडण्यात आली. साम, दाम, दंड, भेदचा वापर करून राज्यात हे महानाटय घडवले. परंतु, राज्यातील मतदारांना हे आवडलेले नाही. त्यामुळेच मतदारांकडून गद्दारांना धडा शिकवला जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
या पत्र परिषदेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार किशोर पाटील, नामदेव पवार, अनिल पटेल, प्रकाश मुगदिया, रंगनाथ पाटील, कॉग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, किशोर पाटील, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, हामद चाऊस, डॉ. शादाब आदींची उपस्थिती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            