नागपूर येथे काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा... जेष्ठ नेत्यांची उपस्थिती
 
                                काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा...
राज्यातील संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा - नाना पटोले
जनविरोधी भाजपा सरकार घालवून काँग्रेस पक्षाचे सरकार आणा - बाळासाहेब थोरात
झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा – अशोक चव्हाण
लोकशाही व डॉ. बाबासाहेबांचे संविधान टिकवण्यासाठी हल्लाबोल मोर्चा. - विजय वडेट्टीवार
दिक्षाभूमी ते मॉरिस कॉलेजपर्यंत काँग्रेसचा तिघाडी सरकार विरोधात भव्य हल्लाबोल मोर्चा
नागपूर,दि.11(डि-24 न्यूज) राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांचे प्रश्न मोठे आहेत पण भाजपाचे आंधळे, बहिरे, मुके सरकार त्याकडे लक्ष देत नाही. मख्यमंत्री प्रश्नांना उत्तरे देत नाहीत तर सुपर मुख्यमंत्री उत्तरे देतात. शेतकऱ्यांना भरपूर मदत दिली असे सुपर मुख्यमंत्री म्हणतात पण ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीच नाही. सरकारने मदत केली तर मग ती गेली कुठे? राज्यात भिषण पाणीटंचाई आहे, एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे ओला दुष्काळ पडला आहे. अवकाळी पावसानेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकरी संकटात असल्याने सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दिक्षाभूमी ते विधानभवन असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो लोकांनी सहभाग घेतला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सुनिल केदार, डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, माजी मंत्री विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार प्रणिती शिंदे, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. कुणाल पाटील, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष तथा आमदार वजाहत मिर्झा, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे, आमदार अभिजित वंजारी, आ. सुभाष धोटे, आ. अमित झनक, नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मिडीया प्रमुख विशाल मुत्तेमवार, मदन जाधव आदी उपस्थित होते.
मोर्चाला संबोधित करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. महाराष्ट्र आज गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दंगली घडवण्यात देशात एक नंबरवर आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे देणेघेणे नाही, बेरोजगारांची थट्टा चालवली आहे. शिक्षण भरतीचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या जात आहेत पण सरकार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगड व मध्य प्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सीमाभागात काँग्रेस पक्षाला मोठे जनसमर्थन मिळालेले आहे. या भागातून 75 ते 100 टक्के काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत, महाराष्ट्रातही काँग्रेसची लाट आहे हे लक्षात घ्या. भाजपा म्हणते तीन राज्यात जिंकलो मग हिम्मत असेल तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावून दाखवा. जनता भाजपाच्या विरोधात आहे हे भाजपालाही माहित आहे म्हणून ते निवडणुकीला घाबरतात.
पंतप्रधान मोदी छत्त्तीसगडमधे धानाला 3100 रुपये भाव व एक हजार बोनस देण्याची तसेच 450 रुपयांना सिलिंडर देण्याची घोषणा करता मग महाराष्ट्रात का देत नाही याचे उत्तर भाजपा सरकारला द्यावे लागेल. हल्ला बोल मोर्चा हा सरकारला एक इशारा आहे हे लक्षात ठेवा. शेतकरी, बेरोजगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महागाई प्रचंड असून जनतेला जगणे कठीण झाले आहे, शिक्षण झाले तरी तरुणांना नोकरी मिळत नाही, जनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. शेतकरी, कामगारांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. हे सरकार आश्वासने भरपूर देते पण तूर्तता करत नाही. वीमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवून लुटत आहेत पण सरकार त्यावर काहीच करत नाही. केंद्रातील भाजपा सरकार गेली 9.5 वर्ष लोकशाहीची पायमल्ली करत कारभार करत आहे. महाराष्ट्रातही तोडफोड करुन सरकार आणले आहे. आता या सरकारला घालवले पाहिजे. महाराष्ट्रातील भाजपा सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणायचे आहे.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, तेलंगणात काँग्रेसने सहा गॅरंटी दिल्या होत्या आणि जनतेने काँग्रेसला भरघोस मतदान करून सत्तेत आणले, कर्नाटकातही काँग्रेसने गॅरंटी दिल्या होत्या व तेथेही काँग्रेसचे सरकार आले आता महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार आणू. बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे पण सरकारने पाच वर्षात नोकर भरती केली नाही. MPSC च्या परिक्षा होत नाहीत, गावात वीज नाही, पाणी नाही, शेती संकटात आहे. बरोजगार, शेतकरी, महिला, शेतमजूर, सफाई कामगारांचे प्रश्न आहेत. सरकारमधील मंत्री एकमेकाविरोधात बोलत आहेत. आजचा हा मोर्चा फक्त काँग्रेसचा नसून जनतेचा आक्रोश दाखवणारा आहे आणि या हल्लाबोल मोर्चामुळे झोपी गेलेले सरकार जागे होईल.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, राज्यातील शेतकरी दुष्काळ, गारपिट, अवकाळी पावसाने देशोधडीला लागला आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी लावून धरत आहोत पण सरकार ऐकत नाही. आता शेतकरीच सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. शिंदे-पवार-फडणवीसांचे सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करत आहे. ‘जनतेला केला भिकारी आणि शासन आपल्या दारी’ अशी अवस्था आहे. अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार नोकर भरती करण्याचे आश्वासन दिले होते पण अजून नोकर भरती नाही. भ्रष्टाचाराकडे लक्ष जाऊ नये, मुळ प्रश्नाकडे लक्ष जाऊ नये म्हणून या सरकारने समाजा-समाजात भांडणे लावली आहेत. सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आम्ही लढतो. लोकशाही टिकवण्यासाठी, डॉ. बाबासाहेबांचे संविधान टिकवण्यासाठी हा मोर्चा आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊन लावून अर्थव्यवस्था बिघडवली परिणामी लघु, मध्यम, छोटे उद्योग बंद पडले आहेत. मोदींनी अर्थव्यवस्था रसातळाला घालवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारचा पराभव केला नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपुष्टात आणले जाईल यासाठी सर्वांनी एकत्र येऊन केंद्रातील भाजपा सरकारचा पराभव करा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष आरेफ नसीम खान, विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, औरंगाबाद शहराध्यक्ष युसुफ शेख यांनीही यावेळी मोर्चेकरांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी केले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            