प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...! पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
 
                                प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...
जिल्हा राज्यात अग्रेसर करु- पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) – देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन समारंभाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात अग्रेसर बनवू असा निर्धार यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी व्यक्त केला. त्यासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन आपली वाटचाल असेल. सगळ्यांनी जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे,असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
पोलीस आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर हा मुख्य शासकीय सोहळा पार पडला. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संदिपान भुमरे, आ. प्रदीप जयस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपत्री संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, स्मार्ट सिटीचे संचालक जगदीश मिनीयार, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर आयुक्त डॉ. अरविंद लोखंडे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. राज्यगीतही सादर झाले. पालकमंत्र्यांनी परेड निरीक्षण करुन उपस्थितांना अभिवादन केले.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना सोबत घेण्याचे आणि समाजातील विविध घटकांना मदत करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी विविध योजना शासनाने राबविल्या आहेत. पालकमंत्री म्हणून माझीही जबाबदारी आहे. यंदा आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी 1200 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
ते पुढे म्हणाले की, आपल्या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. म्हणून या जिल्ह्याची जबाबदारीही मोठी आहे. अजिंठा वेरुळ सारखे जागतिक वारसास्थळे आपल्या जिल्ह्यात आहेत. त्यांच्या विकासासाठीही तरतूद करण्यात आली आहे. म्हणून राज्याच्या प्रगतीत आपले योगदान असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपला जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करु. शहराच्या विकासासाठीही विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण करुन येत्या एप्रिल पर्यंत शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने यंत्रणेने प्रयत्न करावे. शहरात महापुरुषांची स्मारके होत आहेत. त्यापासून प्रेरणा घेऊन सर्व जातीधर्माच्या घटकांनी जिल्ह्याच्या विकासात आपले योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.
नुकत्याच झालेल्या दावोस येथील उद्योग परिषदेत महाराष्ट्राच्या वतीने झालेल्या सामंजस्य करारातील बहुतांश उद्योग हे आपल्या जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे औद्योगिक जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची ओळख निर्माण होणार आहे. हे सरकार हे सगळ्यांचे सरकार आहे. आपण सगळ्यांनी एकोप्याने राहुन आपल्या जिल्ह्यातील शांतता कायम राखू. आपले योगदान देऊ आणि जिल्हा अग्रेसर करु, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले.आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी विविध विभागांमार्फत होत असलेल्या विकास योजना व उपाययोजना यांची माहितीही सांगितली.
 
विविध सन्मान...
प्रजासत्ताक दिन समारंभात विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या व्यक्तिंचा सम्नान करण्यात आला. ध्वजनिधी संकलनासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, सहा. फौजदार एकनाथ दत्तू गायकवाड, तुकाराम आव्हाळे, जीवन रक्षा पदक मिळालेले पोलीस उपनिरीक्षक नजीर नासिर शेख, हवलदार दादासाहेब गोविंद पवार तसेच लोकसेवा हक्क अधिनियमानुसार १०० टक्के प्रकरणांमध्ये विहीत कालमर्यादेत कार्यवाही पूर्ण करणारे संदीप काळे. सय्यद नविदोद्दीन , संजीव शिंदे, श्रीमती सरला देशमुख, सुनिता पदमे, रामकृष्ण बारगळ, संगिता जाधव,डॉ. सुमय्या सैय्यद तसेच सहा. पोलीस उपनिरीक्षक शेख सलीम शेख गनी, हवलदर रामभाऊ खंडागळे तसेच वर्षा देशमुख, मुख्याध्यापकन जि.प. आदर्श उच्च माध्यमिक शाळा जळगाव मेटे, श्रीमती कालिंदी जाधव,ग्रामपंचायत सावखेडा खंडाळा, डॉ. मोनम डव्हळे, आरती कानिसे सरपंच गोलवाडी ग्रा.पं., सुनिल मंगरुळे ग्रामसेवक श्रीराम चव्हाण, सिद्धार्थ दांडगे, उत्तम चव्हाणे सरपंच देव्हारी, तसेच ग्रामपंचायत जरंडी, दादेगाव जहांगीर, कुंभेफळ , गोलवाडी यांनाही सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रविणा कन्नडकर यांनी कार्यक्रमाचे
 
सुत्रसंचालन केले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            