फायर सेफ्टीकडे दुर्लक्ष महागात पडणार, लाॅज, हाॅटेल, पेट्रोल पंपावर होऊ शकते कार्यवाई...?

 0
फायर सेफ्टीकडे दुर्लक्ष महागात पडणार, लाॅज, हाॅटेल, पेट्रोल पंपावर होऊ शकते कार्यवाई...?

फायर सेफ्टीकडे दुर्लक्ष महागात पडणार ! लॉज, हॉटेल, पेट्रोल पंपांवरही होऊ शकते कार्यवाई...?

शहरात 500 हून अधिक लॉजिंग व्यवसाय; त्यापैकी केवळ 51 आस्थापनांकडेच फायर NOC

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) - दिल्लीतील हॉटेलच्या आगीत 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर देशभरात अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व अग्निशमन विभागाने शहरातील लॉज, हॉटेल आणि इतर व्यावसायिक आस्थापनांच्या फायर एनओसी व सुरक्षा व्यवस्थेची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात 500 हून अधिक लॉजिंग व्यवसाय कार्यरत असून त्यापैकी केवळ 51 आस्थापनांकडेच वैध फायर NOC असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याची बाब उघड झाली आहे. फायर NOC नसलेल्या तसेच आवश्यक सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसलेल्या आस्थापनांवर नोटीस, दंडात्मक कारवाई अथवा सीलिंगची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, केवळ लॉज व हॉटेलच नव्हे तर शहरातील अनेक पेट्रोल पंपांवरही अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याची चर्चा आहे. पेट्रोल व डिझेलसारख्या अत्यंत ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेल्या ठिकाणी अत्याधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी फायर सेफ्टी उपकरणांची नियमित तपासणी व देखभाल होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

यामुळे फायर सेफ्टी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवरही प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व व्यावसायिक आस्थापनांनी तातडीने फायर NOC, सुरक्षा प्रमाणपत्रे व अग्निसुरक्षा यंत्रणा अद्ययावत कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेचा इशारा...

फायर NOC व आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसलेल्या लॉज, हॉटेल तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांवर नोटीस, दंड आणि आवश्यकतेनुसार सीलिंगची कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow