दिव्यांगत्व भत्ता वाढवून देण्याच्या आमिषाने फसवणूक...!

 0
दिव्यांगत्व भत्ता वाढवून देण्याच्या आमिषाने फसवणूक...!

दिव्यांगत्व भत्ता वाढवून देण्याच्या आमिषाने फसवणुकीचा प्रकार; पीडित महिलेला पोलिस तक्रारीसाठी महापालिकेची मदत...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) - दिव्यांग व्यक्तींना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे मिळणारा उदरनिर्वाह भत्ता वाढवून देण्याचे आमिष दाखवून एका महिला व तिच्या कुटुंबीयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाने पीडित महिलेला आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले.

तक्रारीनुसार, सुधीर दामोदर बेलेकर (वय 30 वर्षे, रा. आंबेडकर चौक, भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) याने तक्रारदार महिलेच्या वडिलांचा दिव्यांग लाभ वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी विविध शासकीय प्रक्रियेचे कारण सांगत त्याने पीडित महिला व तिच्या बहिणीकडून रोख रक्कम तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मार्च 2026 दरम्यान संबंधित व्यक्तीने तक्रारदारांच्या घरी जाऊन दिव्यांग लाभ वाढवून देण्यासाठी पैसे लागतील असे सांगितले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पीडित महिला व तिच्या बहिणीकडून प्रत्येकी चार हजार आणि दीड हजार रुपये घेतले. मात्र लाभवाढीची कोणतीही कार्यवाही न करता संबंधित व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे दिली. वारंवार मागणी करूनही घेतलेली रक्कम परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे पीडित महिलांचा निदर्शनास आले.

सदर प्रकरण महापालिकेच्या आयुक्त अमोल येडगे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी उप आयुक्त लखिचंद चव्हाण तसेच महिला व बाल कल्याण अधिकारी विनोद परदेसी यांना पीडित महिलेला पोलिस मध्ये तक्रार करण्यास मदत करण्याचे निर्देश दिले होते.

भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत तसेच संबंधितांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी महिलेला कायदेशीर मार्गदर्शन करून जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आवश्यक मदत व सहकार्य केले.

अमोल येडगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय योजना, दिव्यांग लाभ, अनुदान किंवा इतर कोणत्याही शासकीय सुविधांच्या नावाखाली कोणीही व्यक्ती पैशांची मागणी करत असल्यास त्वरित पोलिस प्रशासन किंवा महानगरपालिकेशी संपर्क साधावा.

नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ पारदर्शकपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow