बांधकाम व्यवसायिकासह एकाचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, संदीप सिरसाट यांना अटक

बांधकाम व्यावसायिकासह एकाचे अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी, विधानसभेच्या पराभूत उमेदवाराला अटक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) बांधकाम व्यावसायिकाचे आणि त्याच्या मित्राचे अपहरण करून बेदम मारहाण करण्याची घटना शहरात घडल्याने खळबळ उडाली. त्याचबरोबर त्याला जीवे मारण्याची धमकी देत पिस्तोल रोखण्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी विधानसभा निवडणुकीत दोनदा उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या उमेदवारासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. उमेदवार असलेल्या संदीप शिरसाट या मुख्य आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा शोध घेऊन कारवाई केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वतीने पोलिस निरीक्षक संदीप गुर्मे यांनी दिली आहे.
कोण आहे हा मुख्य आरोपी - अपहरण आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणारा संदीप शिरसाट याने दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. 2019 मध्ये वंचित बहूजन आघाडी तर्फे तर 2024 मध्ये छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षाकडून औरंगाबाद पश्चिम मतदार संघात निवडणूक लढवली होती. त्याचा एक भाऊ पोलिस विभागात कार्यरत असून त्याचे नाव मिथुन शिरसाट आहे. तो सध्या क्रांतीचौक पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. विशेष म्हणजे संदीप याचे वडील हे देखील पूर्वी पोलिसात कार्यरत होते.
बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण - संभाजीनगरमध्ये(औरंगाबाद) बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून विवस्त्र करुन पट्ट्याने मारहाण करण्यात आली. तर सहकाऱ्यालाही डांबून ठेवत जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. शरद राठोड असे या व्यावसायिकाचे नाव असून संदीप शिरसाट याने अपहरण करत मारहाण केल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेची निवडणूक लढवणारा संदीप शिरसाट आणि त्याच्या साथीदारांनी शरद राठोड नामक बिल्डराला अपहरण करून अमानुष मारहाण केली आहे. राठोड यांच्या सहकाऱ्यालाही या टोळीने मारले. या प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुत्र संदीप भाऊसाहेब शिरसाट (रा. सुधाकरनगर), त्याचा भाऊ पोलीस कर्मचारी मिथुन शिरसाट, स्वप्निल गायकवाड, हर्षल, निखिलेश कांबळे अशी आरोपींची नावे आहेत.
जीवे मारण्याची धमकी - याबाबत अधिक माहिती अशी की, शरद राठोड हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची अभिजित ऊर्फ बंटी बर्डे याच्याशी मैत्री आहे. बंटी पूर्वी आरोपी संदीप शिरसाटकडे शासकीय बांधकामाच्या टेंडरमध्ये सहायक म्हणून काम करत होता. मात्र संदीपकडून सतत होणाऱ्या त्रासामुळे त्याने राठोड यांच्या कार्यालयात काम सुरू केले होते. त्यामुळे संतापलेल्या संदीप शिरसाट आणि त्याच्यासोबतच्या दहा ते पंधरा जणांनी बांधकाम व्यावसायिक शरद आणि त्याच्या सोबत असलेल्या एकाचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले. तसेच त्यांनी नग्न करून पट्ट्याने दोघांना मारहाण केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
जुन्या साथीदाराला मारहाण - संदीपने राठोड यांना मारहाण केल्यावर यांच्या डोक्याला पिस्तूल लावून ‘तुला मारून डोंगरात फेकून देतो’ अशी धमकी दिली. यानंतर बर्डेला कॉल करून माझ्या दुचाकीचे पेट्रोल संपले आहे. तू लवकर ये असे सांगण्यासाठी संदीपने राठोड यांना धमकावले. अभिजित पेट्रोल घेऊन आल्यानंतर संदीपच्या कार्यकर्त्यांनी अभिजितला पकडून आलिशान गाडीमध्ये आणले. त्यानंतर त्यालासुद्धा मारहाण करत त्याचा लॅपटॉप घेतला. अभिजितचे जबरदस्तीने कपडे काढून घेतले गेले. तिथे दोघांनाही बेदम मारहाण केली, रविवारी पहाटे त्यांनी राठोड याला त्याच्या घराजवळील देवळाई परिसरात आणून सोडून दिले, कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देखील दिली. अशी माहिती पोलिसांनी दिली.
मित्र न आल्याने पोलीस आयुक्तालयात धाव - शरद राठोड यांची रविवारी पहाटे सुटका झाल्यावर त्यांना वाटले आपला मित्र बंटी याची देखील सुटका होईल, मात्र तसे झाले नाही. सकाळी अकरा पर्यंत बंटीशी संपर्क होण्याची वाट पाहिली. कुठलीही माहिती मिळत नव्हती किंवा संपर्क होत नसल्याने विपरीत घडेल अशी भीती शरद यांना वाटली. त्यांनी वडिलांना सोबत घेऊन थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क केला आणि घडलेला घटनाक्रम सांगितला. आयुक्तांनी गुन्हे शाखेला याबाबत कारवाई करण्याचे थेट आदेश दिले आणि तपासाची चक्र फिरली. 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी असलेल्या संदीप शिरसाट याला अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.
गुन्हा न घडल्याचा करत होते बनाव - आरोपी संदीप शिरसाट याचा एक भाऊ पोलिसात आहे. तो देखील या गुन्ह्यात समाविष्ट होता. गुन्हे शाखेचे पोलीस घरी येऊन गेल्याची माहिती संदीप आणि त्याच्या सोबतच्या लोकांना मिळाली. त्यात त्यांनी शक्कल लढवत ताब्यात असलेल्या अभिजित उर्फ बंटी याला मारहाण करून, आपल्या सोबत काही झाले नाही मी सुरक्षित आहे असे सांग असे सांगितले. तसेच त्याला घेऊन ते सातारा पोलिसात गेले तिथे खोटा जबाब नोंदवण्यासाठी त्याला सांगण्यात आले. मात्र ऐनवेळी गुन्हे शाखेचे पथक तिथे पोहचले आणि त्यांनी जबाब देण्याआधीच संदीप शिरसाट याला अटक करून बंटीची सुटका केली. या प्रकरणी संदीप शिरसाट याला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप गुर्मे यांनी दिली.
What's Your Reaction?






