बालसाहित्याकडे द्या विशेष लक्ष, जिल्हाधिकारी यांची साहित्यिकांना साद...
बाल साहित्यसंमेलन...
बालसाहित्याकडे द्या विशेष लक्ष;जिल्हाधिकाऱ्यांची साहित्यिकांना साद...
भरपूर वाचनानंतरच लेखनाकडे वळावे: संमेलनाध्यक्ष डॉ. विशाल तायडे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- साहित्य हे मानवी जीवनाला आकार देणारे प्रभावी माध्यम आहे. समाजातील दोषांवर प्रहार करत विकृत प्रवृत्तींना वठणीवर आणण्याचे कार्य साहित्य करते. मात्र या समग्र साहित्याचा खरा पाया म्हणजे बालसाहित्य होय. त्यामुळे बालसाहित्याकडे विशेष लक्ष देणे हे प्रत्येक साहित्यिकाचे आद्यकर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जैन इंटरनॅशनल स्कूल, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पहिल्या जिल्हा बालसाहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी साने गुरुजींचा संदर्भ देत सांगितले की, “साने गुरुजी समजून घ्यायचे असतील तर साने गुरुजींच्या आईच्या भूमिकेतून पाहावे लागते. आईला बाळाच्या मनाची, त्याच्या हृदयाची खोल जाण असते. त्या हृदयाला स्पर्श करून साहित्यिकांनी नवनवीन साहित्यकृती निर्माण कराव्यात,” असे भावपूर्ण आवाहनही त्यांनी केले.
संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे यांनी मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याची गरज अधोरेखित केली. “मुलं वाचती होण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच लेखकांनी लिहिण्यापूर्वी भरपूर वाचन केले पाहिजे. सखोल वाचनानंतरच लेखनाला सुरुवात करावी,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
या संमेलनात विद्यार्थ्यांनी कथाकथन, नाट्यछटा, वाद–विवाद तसेच कवी संमेलनाच्या माध्यमातून आपली साहित्यिक व कलात्मक प्रतिभा सादर केली. या प्रतिभेच्या बळावर केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे, तर देशाचेही भविष्य उज्ज्वल होईल, असाआशावादी सूर उपस्थित साहित्यिकांमधून व्यक्त झाला.
संमेलनाच्या स्वागताध्यक्ष तथा शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर-पानसरे यांनी शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांसाठीही साहित्य संमेलनाची चळवळ अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
संमेलनाची सुरुवात पारंपरिक ग्रंथदिंडीने करण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभूषेतील सहभागींनी ग्रंथदिंडीला विशेष शोभा आणली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब यांनीही मार्गदर्शन केले.
संमेलनास प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या संचालिका शैलजा दराडे, डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. सुनीता राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कथाकथन सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. हबीब भंडारे होते. उपशिक्षणाधिकारी दीपाली थावरे व शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप चौरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाट्यछटा सत्राचे अध्यक्ष मा. रमेश ठाकूर होते तर उपशिक्षणाधिकारी सीमा मेहेत्रे आणि कवी सुनील डोके प्रमुख म्हणून उपस्थित होते.
वादविवाद सत्राचे अध्यक्ष व्याख्याते व लेखक डॉ. संजय गायकवाड होते तर शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री आशा डांगे होत्या तर राजीव मासुरळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारोप सत्राचे अध्यक्षपद ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉ. लीला शिंदे यांनी भूषविले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सिताराम पवार, कल्पना पदकोंडे आणि मनीषा वाशिंबे उपस्थित होते.
या संमेलनात सर्व तालुक्यांतील, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग नोंदविण्यात आला. या संमेलनात एकूण ३०० कुमार साहित्यिकांनी आपल्या सादरीकरणातून प्रगल्भ साहित्यिक अभिव्यक्ती साकार करत उपस्थितांची दाद मिळवली.
जिल्हाधिकारी रमले बालकलावंतात
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रेक्षकात बसलेल्या वारकरी वेशभुषेतील बालकाला आपल्या जवळ बोलावून व्यासपीठावर आपल्या शेजारी बसविले. त्यानंतर एका बालकलाकाराच्या आग्र
हास्तव भजनही गायले.
What's Your Reaction?