मतमोजणी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावे - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
 
                                मतमोजणी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी...
औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) मतमोजणीसाठी नियुक्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निर्दोष पद्धतीने पार पाडता यावी यासाठी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
१९ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया मंगळवार दि.४ जून रोजी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण आज वंदे मातरम सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणास पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, व्यंकट राठोड, एकनाथ बंगाळे उपस्थित होते.
पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी कायदा सुव्यवस्थेविषयी सगळ्यांना माहिती दिली. त्यात प्रवेश, पार्किंग व्यवस्था,सुरक्षा व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींचा प्रवेश, मीडिया सेंटर आणि कम्युनिकेशन सेंटर याबाबत माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी मतमोजणी प्रक्रियेबाबत माहिती दिली.
उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी पोस्टल मतमोजणीबाबत माहिती दिली. समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त अधिकारी तसेच सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशिक्षणास हजर होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, मतमोजणी प्रक्रियेत काम करताना निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व नियमाचे पालन करावे, यामध्ये सूक्ष्म निरीक्षक, पोलीस अधिकारी- कर्मचारी यांनी आपापले कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्व तयारी करावी. मतमोजणी ही प्रक्रिया संयुक्त असून त्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे समन्वय राखून सगळ्यांनी कामकाज करावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            