महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल - रावसाहेब दानवे

 0
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल - रावसाहेब दानवे

महायुतीच्या उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा; शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.27(डि-24 न्यूज) विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पूर्व मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल मोरेश्वर सावे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. भारतीय जनता पक्षासह शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि इतर घटक पक्षांच्या समर्थनासह महायुतीने सावे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे.

उद्घाटन सोहळ्यात ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी "अबकी बार हॅट्रिक पार, सबको भावे अतुल सावे" अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. अनेक कार्यकर्ते, मतदार बंधू-भगिनींची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून आली. उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महायुतीच्या सरकारबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला.

महायुतीचे सरकार येईल रावसाहेब दानवे यांचा आत्मविश्वास

दानवे म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असेल, विशेषतः छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदार संघाकडे. "राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल याबाबत शंका नाही. आपल्या सरकारने राज्यात अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. विरोधकांनी लाडकी बहिण योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना 2,000 रुपये दिले जातील," असे त्यांनी स्पष्ट केले.

दानवे यांनी विरोधकांवर टीका करत "अडीच वर्षाच्या आघाडी सरकारच्या कामकाजाचा आढावा घेतल्यास विकासाऐवजी राजकीय संघर्ष दिसून येतो. आता महायुतीच्या विजयाने पुन्हा राज्यात स्थिर सरकार येईल," असे मत व्यक्त केले.

अतुल सावे : माझ्यावर विश्वास ठेवला; मतदारांच्या पाठिंब्याबद्दल आभार

महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी 2014 आणि 2019 मध्ये मिळालेल्या मतदारांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, "मतदारांनी मला दोन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. या वेळेस तिसऱ्यांदा मतदार माझ्या पाठीशी उभे राहतील याचा मला विश्वास आहे."

छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्यात आल्याचे सावे यांनी सांगितले. त्यांनी मतदार संघातील गुंठेवारी भागातील समस्या सोडवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. "शहरातील कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, आरोग्य, पाणी पुरवठा अशा महत्त्वाच्या विषयांवर काम करण्यावर आम्ही भर दिला आहे. 750 कोटींचा निधी रस्त्यांच्या सुधारणा आणि विकासासाठी वापरला आहे," तसेच सिडको मधील घरे लिज होल्ड होती ती आपल्या सरकारने फ्री होल्ड करत नागरिकांना दिलासा देण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले असल्याचे श्री अतुल सावे यांनी सांगितले.

पाणी पुरवठा योजना आणि नामांतराविषयी आत्मविश्वास :- अतुल सावे 

शहरातील पाणी पुरवठा योजनेसाठी महाविकास आघाडी सरकारने निधी देण्यास विलंब केला, मात्र महायुती सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. "लवकरच नागरिकांना मुबलक पाणी मिळेल," असे आश्वासन अतुल सावे यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर शहराचे नामांतर करण्यात आले तेव्हा सावे स्वतः त्या बैठकीत होते, याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला. काही विरोधकांना हे नामांतर रुचले नसल्याने त्यांना पुन्हा हैद्राबादला पाठवले जाईल असे त्यांनी टीकेच्या स्वरात सांगितले.

खा. संदीपान भुमरे: ९ पैकी ९ जागा महायुतीच्या

खा. संदीपान भुमरे यांनी सांगितले की, "अतुल सावे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी खूप मेहनत घेतली आहे. या विधानसभेत जिल्ह्यातील ९ पैकी ९ जागा महायुतीच्या येतील." त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविलेल्या लाडकी बहिण योजनेलाही महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाहन रॅली

महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युवा मोर्चाच्या वतीने भव्य वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गजानन महाराज मंदिरापासून सुरू होणारी ही रॅली शहरातील प्रमुख चौकांतून जात जाफर गेट आणि संस्थान गणपती येथे समाप्त होईल.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खा. संदिपान भुमरे, खा.डॉ भागवत कराड, आ. संजय शिरसाठ, आ. प्रदीप जैस्वाल, अरविंद मेनन, शिरीष बोराळकर, राजेंद्र जंजाळ, गवळी साहेब, दत्ता भांगे, श्रीकांत जोशी, विवेक देशपांडे, भाऊसाहेब देशमुख, नागेश भालेराव, सुहास शिरसाठ, प्रतिभाताई जगताप, तसेच महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow