महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा
 
                                महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची उद्या जाहीर सभा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री अतुल सावे, श्री प्रदीप जैस्वाल, श्री संजय शिरसाठ, यांच्या प्रचारासाठी शनिवार 9 नोव्हेंबर रोजी एन-6 बजरंग चौक येथे सायं. 05 वाजता, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. श्री सावे यांच्या प्रचाराला बळकटी देण्यासाठी फडणवीस सभेमध्ये उपस्थित राहणार असून, मतदारांशी थेट संवाद साधून महायुतीचे धोरणे, विकासाची वचने आणि स्थानिक मुद्द्यांवरील भूमिका स्पष्ट करतील.
या जाहीर सभेच्या यशस्वीतेसाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मुख्य प्रचार कार्यालयात नुकतीच एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली, ज्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सभेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रचार मोहिमेचा उरलेला कालावधी अधिकाधिक प्रभावी बनवण्यासाठी कार्यकर्त्यांना विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, या सभेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरिकांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
महायुतीचे उमेदवार श्री अतुल सावे यांनी या सभेला यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे. या सभेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत महायुतीची विकास दृष्टी पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसांत प्रचाराचा रंग अधिक गडद होताना दिसेल, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे सभेला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळण्याची अपेक्षा आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            