मार्टिचा लाभ विद्यार्थ्यांना कधी मिळणार...

 0
मार्टिचा लाभ विद्यार्थ्यांना कधी मिळणार...

मार्टि साठी मार्ग खुला – उपमुख्यमंत्री अजित दादांच्या हस्ते उदघाटनाची प्रतीक्षा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (MRTI)”, छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या कार्याला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

संस्थेच्या प्राथमिक स्थापनेनंतर आता तिच्या नोंदणीसाठी आणि कार्यकक्षा निश्चितीसाठी शासनाने शेख रशिदोद्दीन शमशोद्दीन यांची सल्लागार (Advisor) म्हणून 31 ऑक्टोबर 2025 रोजी नियुक्ती केली आहे.

ही नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाच्या दि.10 जून 2025 च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींनुसार करण्यात आली असून, सेवानिवृत्त विशेष लेखा परीक्षक (वर्ग-1), सहकारी संस्था या पदावरून करार पद्धतीने ही जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली आहे.

MOA व AOA तयार करण्याची जबाबदारी

मार्टि संस्थेची नोंदणी कंपनी कायद्यांतर्गत करण्यासाठी तसेच संस्थेची कार्यकक्षा व उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी आवश्यक MOA (Memorandum of Association) आणि AOA (Articles of Association) तयार करण्याचे महत्वाचे कार्य सल्लागारांकडे सोपवण्यात आले आहे.

अल्पसंख्याक विकासासाठी नवे पर्व...

राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा अभ्यास करून शासनाला उपाययोजना सुचवणे आणि प्रशिक्षण देणे — या उद्देशाने शासनाने दि.22 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये “अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (MRTI)” या स्वायत्त संस्थेची स्थापना केली होती.

बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर स्थापन झालेली ही संस्था अल्पसंख्याक समाजासाठी अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षणाचे केंद्र ठरणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow