कुरान आणि प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मानवतेचा संदेश दिला - मौलाना हलिमुल्लाह कासमी
कुरान आणि पैगंबर मोहम्मद यांनी मानवतेचा संदेश दिला – मौलाना हलिमुल्लाह कासमी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7 (डि-24 न्यूज) – “इस्लाम धर्माचे अनुकरण करणारेच नव्हे, तर इतर धर्मांचे पालन करणारेही आपलेच भाऊ आहेत. कुरान आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मानवतेचा, प्रेमाचा आणि बंधुत्वाचा संदेश जगाला दिला आहे. समाजात द्वेष नव्हे, तर एकात्मता भाईचारा वाढायला हवा,” असे प्रतिपादन जमियते-उलमा-ए-हिंद (अर्शद मदनी) यांच्या वतीने रोशन गेट येथे आयोजित ‘सिरत-उन-नबी’ कार्यक्रमात महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलाना हलिमुल्लाह कासमी यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, “मुस्लिम समाजाविषयी गैरसमज व द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यांच्या विरोधात कायदे बनवले जात आहेत. त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा अशा परिस्थितीत मुस्लिम समाजाने संयम, समझदारी, आणि कायद्याचे पालन करत एकोपा व भाईचारा जपणे आवश्यक आहे.” आपले संस्कार विसरून चालणार नाही.
वक्फ संशोधन कायद्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात या कायद्याविरोधात लढा सुरू आहे. “हा कायदा मान्य नसला, तरी सरकारने लागू केलेल्या ‘उमीद पोर्टल’वर धार्मिक स्थळांची नोंदणी केल्याने नुकसान होणार नाही. वक्फ मालमत्तेचे संरक्षण करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
5 डिसेंबरपर्यंत उमीद पोर्टलवर नोंदणी करा – वक्फ बोर्डाचे आवाहन
या प्रसंगी महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांनी राज्यातील मुस्लिम समाजाला आवाहन करत सांगितले की, मस्जिद, दर्गा, खानकाह तसेच इतर वक्फ मालमत्तांची नोंदणी 5 डिसेंबरपूर्वी उमीद पोर्टलवर अनिवार्यपणे करावी.
त्यांनी माहिती दिली की:
राज्यात वक्फची लाखो एकर मालमत्ता आहे
20 हजारांहून अधिक संस्थांपैकी फक्त साडेतीन हजारांनी नोंदणी झाली आहे.
अंतिम मुदत संपल्यास न्यायालयीन प्रक्रिया करावी लागेल आणि मोठा आर्थिक बोजा येऊ शकतो.
आवश्यक कागदपत्रे जिल्हा वक्फ कार्यालयातून मिळतील.
पोर्टलवरील काम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार.
“मुदत वाढवण्याचा अधिकार सरकारकडे नाही. सर्वोच्च न्यायालयानेच तारीख निश्चित केली असल्यामुळे समाजाने वेळेत नोंदणी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात सन्मान व मार्गदर्शन
कार्यक्रमात मौलाना हलिमुल्लाह कासमी यांचा स्मृतीचिन्ह आणि फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
तसेच “वक्फ उमीद पोर्टल – मराठवाडा प्रशिक्षण सत्र” व “वक्फ मालमत्तेची सुरक्षा आणि जवाबदारी” या विषयांवर चर्चा करण्यात आली.
व्यासपीठावर मौलाना मोईजोद्दीन कासमी, मुफ्ती कलिम बेग, कारी मोहम्मद रशीद, नुमायंदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाऊद्दीन सिद्दीकी, मौलाना अब्दुल शकुर, मौलाना शरीफ निजामी, कारी निजामुल, मुफ्ती अनिसुर्रहमान, मुफ्ती हाफिजुल्लाह, मौलाना निजाम मिल्ली, हाफीज इक्बाल अन्सारी, वक्फ बोर्ड सदस्य एड इफ्तेखार हाश्मी, डॉ. अजिज कादरी, इब्राहीम पठाण, मोहसीन पहेलवान, इलियास किरमानी, जावेद कुरेशी, हाजी याकूब खान, हाजी इसाक खान, मौलाना अब्दुल मतीन, अतिक पालोदकर, एड जकी पटेल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जमियते-उलमा-ए-हिंदचे शहराध्यक्ष हाफीज अब्दुल अजिम व शहर उपाध्यक्ष मुस्तफा खान यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना अब्दुल मतीन त्यांनी केले.
What's Your Reaction?