माविमच्या बचत गट उत्पादन प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा शुभारंभ

 0
माविमच्या बचत गट उत्पादन प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा शुभारंभ

माविमच्या बचत गट उत्पादन प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा शुभारंभ

आर्थिक सबलीकरण हीच महिला विकासाची गुरुकिल्ली-मान्यवरांचे प्रतिपादन

औरंगाबाद,दि.15(डि-24 न्यूज)- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांमार्फत उत्पादन केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री महोत्सव 2023 चा आज शुभारंभ करण्यात आला. महिलांचे आर्थिक सबलीकरण हीच महिलांच्या विकासाची गुरुकिल्ली आहे,असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत बळवंत वाचनालय सभागृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचा आज मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रिय व्यवस्थापक विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील 30 बचतगट सहभागी

 या उपक्रमात जिल्ह्यातील 30 महिला बचत गट सहभागी झाले असून त्यांची विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

क्षमता व कौशल्यांची वाढ करा- श्रीमती जाधव

 उपस्थित महिलांशी संवाद साधतांना श्रीमती सुवर्णा जाधव म्हणाल्या की, महिलांनी आपल्यातील क्षमता व कौशल्यांची वाढ केली पाहजे. महिलांनी आपले आर्थिक व्यवहार कौशल्य वाढवावे. आर्थिक सबलीकरणातून महिलांचे सक्षमीकरण होणार आहे. आपण जे काही आपण उत्पादन तयार करणार आहोत त्याचा सर्वतोपरी अभ्यास करावा. बाजारपेठ बघून मग उत्पादनात वाढ केली पाहिजे. आपण जे काही करणार त्याचे प्रामाणिक योगदान द्यावं. महिलांच्या या शक्तीला मदत करण्यासाठी मनापासून गरजू आणि गरजवंत याचा अभ्यास करून नवीन उपक्रम राबवू,असेही त्यांनी सांगितले.

कर्ज परतफेडीत महिला बचतगट अग्रेसर- केदार

जिल्हा अग्रणी बॅंकेचे मंगेश केदार म्हणाले की, महिला बचतगट कर्ज परतफेडीत अग्रेसर आहेत. महिला बचतगटांसाठी व्यवसायांसाठी अर्थसहाय्य देण्यास बॅंका सकारात्मक आहेत,असे त्यांनी सांगितले. महिला बचत गटांनी कर्जाच्या मदतीने मोठे उद्योग व्यवसाय करावेत,असेही त्यांनी सांगितले.

मोठ्या व्यापक व्यवसायांकडे जा- विवेक नाचणे

क्षेत्रिय प्रबंधक विवेक नाचणे यांनी सांगितले की, महिला बचत गटांनी आता ठराविक चाकोरीबद्ध व्यवसायांमधून मोठ्या व्यापक व्यवसायांकडे जायला हवे. विविध सेवा उद्योग, समाजातील बदलत्या सवयी,परंपरा यांचा अभ्यास करुन व्यवसाय वाढवावा. ते म्हणाले की, महिला आर्थिक साक्षर होताना कुटूंबाची जबाबदारी घेते. सध्याचे युग हे बाजारपेठ युग आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वेगळ्या व्यवसायाची निवड महिलांनी करावी. महिला टुंबाचे व्यवस्थापन करतात त्यामुळे त्या उत्तम व्यवस्थापक असतात. त्यांना व्यवस्थापन शिकवण्याची गरज नाही. बचतगटांनी आता आपल्या उत्पादनाची ओळख व विक्री ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरुन करण्यासाठी प्रयत्न करावेत. महिला बचत गटांना व्यवसाय कर्ज देण्यासाठी बॅंका त्यांच्या पाठीशी आहेत, असेही त्यांनी आश्वस्त केले.

प्रास्ताविक जिल्हासमन्वयक चंदनसिंग राठोड यांनी केले. सुत्रसंचालन सुनिल पैठणे यांनी तर आभारप्रदर्शन नागमणी भुरेवार यांनी केले.

 

महिलांसाठी व्याख्याने

या कार्यक्रमात शनिवार दि.16 रोजी बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने यांचे ‘आजची स्त्री व सायबर गुन्हे’, या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानास जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रदीप झोड, सहा. आयुकत कौशल्य विकास सुरेश वराडे उपस्थित राहणार आहेत. तसेच रविवार दि.17 रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी.आर. देशमुख, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, सहाय्यक आयुक्त मनपा अशोक कायंदे, नाबार्ड जिल्हा विकास प्रबंधक सुरेश पटवेकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड व लोकसंचालित साधन केंद्रांचे सर्व अध्यक्षांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow