मी जिल्हा परिषद शाळा बोलतेय, वाचा मन सुन्न करणारा लेख...
मी जिल्हा परिषद शाळा बोलते.....वाचा मन सुन्न करणारा लेख...
माझा जन्म 1952 ला झाला अनेक दानशूर व्यक्तींनी माझ्या निर्माणासाठी जमिनी दान दिल्या. त्यांच्या अमूल्य योगदानातून मी घडले माझी सुरुवात झाली. मी अनेक विद्यार्थ्यांना खेळताना, रडताना, हसताना, पडताना, पडून उठताना, शिक्षण आत्मसात करताना पाहिले आहे. अनेक विद्यार्थ्यांची भविष्य मी घडवले डॉक्टर, इंजिनीयर, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक व अधिकारी, वकील, प्राध्यापक, पत्रकार, खासदार आमदार न्यायाधीश, पोलीस, शिक्षक, शासकीय कर्मचारी घडवण्यात माझा मोलाचा वाटा आहे.
1952 पासून मी निरंतर कार्य करत होते पण खाजगीकरणाच्या अती शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे, खाजगीकरणामुळे विद्यार्थी पटसंख्या अभावी मला तात्पुरते कुलूप लावण्यात आले. आज मी ओसाड पडलेली आहे मला विद्यार्थ्यांचे रडणे, हसणे, खेळणे, शिकणे आठवत आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना हाक मारत आहे. ज्या विद्यार्थ्यांना घडवले प्रतिष्ठा, मान सन्मान मिळवून दिला ते विद्यार्थी कोठे आहेत...?? मी त्यांना बोलवत आहे. हाक मारत आहे कोणी मला जीवनदान, पुनर्जन्म देईल का...?? मुलांनो मी तुमची जिल्हा परिषद शाळा बोलत आहे.
तुम्हाला मी जगणे व जगवणे शिकवले. आज मी मृत्यूच्या दारात उभी आहे मी तुमची आई तुम्हाला हाक मारत आहे, की मला वाचवा मी मरणाच्या दारात उभी आहे या रे...! माझ्या मुलांनो मला पुनर्जन्म द्या रे...! जणू ही हाक माझ्या काही विद्यार्थ्यांनी ऐकली काही विद्यार्थी मला येऊन भेटले. माझी दूरदषा पाहिली काही विद्यार्थ्यांच्या काळजाला पाणी सुटले त्याची जाणीव मला झाली. आणि त्यातूनच एका चळवळीला सुरुवात झाली.
असंख्य माझ्या विद्यार्थ्यांना कळकळीची हाक मारत आहे आणि हक्काने आदेश देत आहे. माझ्यासाठी धावून या...?मला वाचवा...? मी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा बोलत आहे.
काही विद्यार्थ्यांनी ही हाक ऐकली आणि त्यांनी निश्चय केला की आपण आपल्या शाळेला जगवले पाहिजे. मी शकीला शेख अशाच एका जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज या शाळेतील घटने विषयी सांगत आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केजचा जन्म 1952 ला झाला. अनेक इनामदार बांधवांनी शाळेच्या निर्माणसाठी व क्रीडांगणासाठी जमीन दान दिली. त्यांच्या या बहुमूल्य योगदानातून शाळा उभी राहिली असे कळते.
1952 पासून 2004 पर्यंत निरंतर कार्य तीने केले पण. खाजगीकरणाच्या अति प्रभावामुळे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या घटत गेली. त्यामुळे प्रशासनामार्फत शाळेला तात्पुरते कुलूप लावण्यात आले. काही माजी विद्यार्थ्यांना आपली जिल्हा परिषद शाळा जगली पाहिजे असे वाटू लागले.
मोहन भाई गुंड, सुनील हलसुलकर, तय्यब शेख, अभय कुलकर्णी, संजय चावरे, भोसले सर आदींनी पुढाकार घेऊन सर्व माजी विद्यार्थ्यांना गोळा केले ते यशस्वी झाले.
यांनी 1952 पासून शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार केला. 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन आपण सर्वांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेत साजरा करण्याचा निश्चय केला. या माध्यमातून शाळेला पुनर्जन्म देण्याची नीव उभारण्यात आली. तो ऐतिहासिक क्षण आला.
26 जानेवारी 2026 जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मैदान माजी विद्यार्थ्यांनी गच्च भरले गेले. सर्वांचा उत्साह, आनंद दिसून येत होता. काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी येत होते. शाळेला पाहून काहींचे मन भरून येत होते. काहीं चर्चेच्या माध्यमातून मत व्यक्त करत होते. प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यानंतर पूर्ण गावातून माजी विद्यार्थी जे अधिकारी, न्यायाधीश, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, प्राध्यापक, पत्रकार, शिक्षक, शासकीय कर्मचारी बनलेले आहेत या सर्वांचे प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व आणि शाळेत प्रवेश घेण्यासाठी आव्हान करण्यात आले. सर्वांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आज कोणी अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पोलीस, शिक्षक नव्हता तो फक्त आणि फक्त विद्यार्थी होता. प्रभात फेरी नंतर सर्व शाळेत एकत्र आले शाळेच्या मैदानावर खुर्च्या कमी पडल्या होत्या एवढे माजी विद्यार्थ्यांची संख्या होती लहानपणी जसे मैदानात बसायचे तसेच आज अनेकजण जमिनीवर बसलेले पाहण्यात आले. आज त्यांना ऊन लागत नव्हते. आज त्यांचे पांढरे शुभ्र कपडे मातीत खराब होणार नव्हते. आज कोणीच अधिकारी कर्मचारी नव्हता सर्व फक्त आणि फक्त विद्यार्थी होते.
पतकी सर, जाधव सर, रहेकवाल सर या शिक्षक वृंदाचे चरण पक्षालन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी शिक्षकांचे डोळे पानावत होते अनेक विद्यार्थ्यांनी आपले शाळेतील अनुभव व्यक्त केले काहीजण तर भावूक होत होते आज या मैदानावर शाळेला जगवण्यासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी देणगी दिली. काहींनी शाळेच्या खोल्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले, काहींनी शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची जाहीर केले, काहींनी खेळाची किट देण्याचे जाहीर केले तर काही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या नातू नातीचा प्रवेश घेतला. कार्यक्रम सुरू असतानाच 11 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला तर काही खाजगी शिकवणीच्या शिक्षकांनी आम्ही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी देण्याचे सांगितले. एका माजी विद्यार्थ्यांनी 26 जानेवारी 2026 रोजी येणाऱ्या सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक वृंद व इत्यादी सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली . (जवळपास 700 ते 800 ) हे पाहून मला असा विश्वास वाटत आहे की जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज हे येत्यावर्षी शंभर टक्के सुरू होईल आणि ह्या लेखाच्या माध्यमातून मला असे वाटते की आपली हक्काची शाळा गोरगरिबांची - श्रीमंतांची शाळा सर्वसामान्यांची शाळा ही जगलीच पाहिजे!!!!! जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज येथून सुरुवात झाली आहे. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषद शाळा जगविण्याचे काम निश्चित तेथील माजी विद्यार्थी सुरू करतील. याचा मला विश्वास आहे त्याचे सर्वात मोठे उदाहरण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज हे दिसून येते.
या ऐतिहासिक सोहळ्याचा व जिल्हा परिषद शाळा पुनर्निर्मितीचा मी ही एक भाग होते याचा मला सार्थ अभिमान आहे.
साभार...सामाजिक कार्यकर्ता, श्रीमती शकीला एस.शेख, नांदेड
What's Your Reaction?