मोंढानाका ते एपिआय काॅर्नर दरम्यान 180 बांधकामे निष्कासित, सोमवारी पुन्हा कार्यवाई...

मोंढा नाका ते एपीआय कॉर्नर दरम्यान 180 बांधकामे निष्कासित
दोन दिवसांच्या विश्रांती नंतर सोमवार पासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)- महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत मोंढा नाका ते एपीआय कॉर्नर दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण 180 एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल, दुकाने, शेड, कंपाऊंड, शेड, गॅरेज, कमान, जाहिरात फलक, इ. निष्कासित करण्यात आले.
सदर कारवाई मध्ये महानगरपालिकेच्या 350 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे 250 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी 15 जेसीबी, 4 पोकलॅन, 15 टिप्पर, 2 रूग्णवाहिका, 2 कोंडवाडा वाहने, 2 अग्निशमन बंब, 5 इलेक्ट्रिक हायड्रॅालीक वाहने इ. वाहनांचा समावेश होता.
सदरील कारवाई मध्ये नगररचना विभागाचे उप संचालक मनोज गर्जे,कार्यकारी अभियंता (यांञिकी) अमोल कुलकर्णी, पोलीस उप आयुक्त प्रशांत स्वामी, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, अशोक गिरी, समीउल्लाह, भारत बिरारे, राहूल जाधव, नईम अन्सारी व इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, सय्यद जमशेद, सय्यद मजहर अली, नगररचना विभागाचे सौरभ साळवे,
सुरज सवंडकर, राहूल मालखेडे, शिवाजी लोखंडे व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव सहभागी होते.
आजच्या कारवाईत 8 मालमत्ता धारकांना नोटीस देण्यात आल्या आहेत व उर्वरित 19 मालमत्ता धारकांना येत्या सोमवारी नोटीसेस बजावण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिक्रमण विभागामार्फत देण्यात आली आहे.
दोन दिवसांची विश्रांती नंतर सोमवारी कारवाई...
शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम दिनांक 3 जून पासून सतत सुरू आहे. आज शुक्रवार रोजी ही मोहीम मोंढा नाका ते एपीआय कॉर्नर पर्यंत घेण्यात आली. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांची विश्रांतीनंतर सदरील मोहीम सोमवारपासून सुरू राहील, अशी माहिती संतोष वाहूळे यांनी यावेळी दिली.
जालना रोड हा शहरासाठी महत्वाचा मानला जातो या रस्त्याला लाईफ लाईन पण म्हणतात. मागिल दोन दिवसांपासून जालना रोडवर अतिक्रमणे काढण्याची कार्यवाई सुरु आहे. मोंढानाका येथून हि कार्यवाई सकाळपासून सुरु करण्यात आली. आकाशवाणी सिग्नलवर दोन तास हि मोहिम रोखण्यात आली. काही प्रतिष्ठित मालमत्ताधारकांना दुपारपर्यंत वेळ देण्यात आली. दुपारी तीन वाजेपासून पुन्हा मोहिम सुरु करण्यात आली. रोडवरील मोंढानाका ते सेवनहिल उड्डाणपूलपर्यंतच्या 45 मिटर रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी मालमत्तांची मोजणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सिंधी कॉलनीतील गुरुद्वाराची कमान काढून घेण्यास कमिटीला 7 दिवसांची मुदत देण्यात आली. सेवनहिल उड्डाणपूल ते एपीआय कॉर्नरपर्यंतच्या 60 मिटर रस्त्यासाठी एमआयडीसी आणि सिडकोच्या भूखंडावरील प्रतिष्ठित व्यवसायिक मालमत्ताधारकांच्या मालमत्तांची मोजणी करण्यात आली. या रस्त्यावरील बांधकामांना मनपाची परवानगी आणि भोगवटाप्रमाणपत्र असल्यामुळे त्यांना बाधित बांधकाम काढून घेण्यास वेळ देण्यात आला.
महापालिकेने गुरुवारी जालना रोडवरील बाबा पेट्रोल पंप ते मोंढानाका उड्डाणपूलापर्यंत 229 मालमत्तांच्या संरक्षण भिंती पाडण्यात आल्या. आज शुक्रवारी मोंढानाका ते सेव्हनहिल उड्डाणपूलपर्यंत 45 मिटर रस्त्यासाठी दोन्ही बाजूंनी साडेबावीस मिटरपर्यंत मार्किंग करून अतिक्रमण काढण्यात आले. मोंढानाका उड्डाणपूलाच्या उजव्या बाजूने सिंधी कॉलनीतील व्यवसायिक दुकाने अडीच फुट बाधित होत असल्याने जेसीबीच्या साह्याने पाडापाडी करून रस्ता रुंद करण्यात आला. या ठिकाणी गुरुद्वाराची भव्य कमान उभारली असून ही कमान रस्त्यामध्ये बाधित होत असल्याने गुरुद्वारा कमिटीला 7 दिवसात कमान काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आल्याचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.
आकाशवाणी समोरील अतिक्रमण जेसीबीने काढताना लोखंडी पाईप सहा आयुक्त अर्चना पवार यांना पायाला थोडी दुखापण झाली यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. उपायुक्त सविता सोनवणे यांनी त्यांना सांभाळत धीर दिला. औषधोपचार केल्यानंतर त्या कर्तव्यावर पुन्हा पथकासोबत काम न थांबवता चालत होत्या.
मोंढानाका सोडल्यानंतर उजव्या बाजूने मराठवाडा गोदावरी खोरे पाटबंधारे महामंडळाचे कार्यालय आणि आकाशवाणी केंद्र आहे. या दोन्ही कार्यालयांना संरक्षण भिंत काढून घेण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. डाव्या बाजूने व्यवसायिक मालमत्तांचे अंतर सोडून नियमानुसार बांधकाम केले असल्याने त्यांच्यावर जुजबी कारवाई केली. शिवशक्ती कॉलनीतील गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या जागेत एका बाजूने लक्ष्मीनारायण मंदिर असून दुसर्या बाजूने ऑडस्पेसच्या जागेत पाच दुकाने बांधून त्यावर हॉल काढण्यात आला आहे. ही दुकाने मनपाच्या मालकीची असल्याचे आज कारवाई दरम्यान निदर्शनास आले. मनपाच्या मालकीची दुकाने असतानाही त्याकडे एकही अधिकार्याने लक्ष दिले नाही. अनेक वर्षापासून दुकानामध्ये बिनबोभाट व्यवसाय सुरू होता. मनपाची दुकाने असल्याचे लक्षात येताच संतोष वाहुळे यांनी 5 दुकानांची पाहणी करून दुकाने सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दुकानांना सील ठोकण्यात आले. त्यापुढे मनपाची परवानगी न घेता पत्र्याच्या शेडमध्ये 5 दुकानांचे असलेले बांधकाम काढून घेण्यास दुकानमालकांना संध्याकाळपर्यंत वेळ देण्यात आला.
सेवनहिल उड्डाणपूलासमोरच असलेल्या शिवा ट्रस्टच्या इमारतीच्या पायर्या बाधित होत असल्याचे मोजणीमध्ये निदर्शनास आले. त्यामुळे या पायर्या तोडण्याची कारवाई करण्यात आली. एका बाजूच्या पायर्या ठेवण्यात आल्या असल्यातरी दोन्ही बाजूच्या पायर्या तोडल्यामुळे इमारतीमध्ये जाण्यास अडचण निर्माण झाल्याचे दिसून आले. या उड्डाणपूलाच्या उजव्या बाजूने असलेल्या खासगी प्रतिष्ठानांच्या इमारतींच्या संरक्षण भिंती पाडण्याची कारवाई करण्यात आली.
सेवनहिल उड्डाणपूल उतरल्यानंतर जालना रोड 60 मिटरचा आहे. या रोडवर एमआयडीसीच्या भूखंडावर प्रतिष्ठित मोठ्या आस्थापना आहेत. या आस्थापनाची मोजणी एमआयडीसी आणि मनपा अधिकार्यांनी संयुक्तपणे केली. तसेच त्यापुढे सिडकोच्या भूखंडावरील मालमत्ता आहेत. एका बाजूने सर्व्हिस रोड असल्यामुळे रस्त्याच्या डाव्या बाजूने असलेल्या इमारतींची 30 मिटरनुसार मोजणी केली.
What's Your Reaction?






