राज्यातील 485 आश्रमशाळा सौर ऊर्जेने उजळणार - मंत्री अतुल सावे

 0
राज्यातील 485 आश्रमशाळा सौर ऊर्जेने उजळणार - मंत्री अतुल सावे

राज्यातील 485 निवासी आश्रमशाळा सौरऊर्जेने उजळणार...

पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्याचा शासनाचा निर्णय

मुंबई, दि.20 (डि-24 न्यूज) : विजेची वाढती गरज लक्षात घेता वीज निर्मितीसाठी पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करून सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील 485 निवासी आश्रमशाळांमध्ये प्रत्येकी 10 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसविण्याचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री अतुल सावे यांनी बैठकीत दिले.

निवासी आश्रमशाळांमध्ये सौर ऊर्जेचा वापर अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी मंत्रालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत आश्रमशाळांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली बसविण्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नेट मीटर, थ्री-फेज मीटर आणि वीज भार वाढविण्यासंदर्भातील अडचणी महिनाभरात दूर करण्याचे निर्देश महावितरण आणि महाऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर आश्रमशाळांच्या वीज खर्चात बचत होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि शाश्वत सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. आश्रमशाळांमध्ये विविध सौर सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद शासनाच्या योजनांमध्येही करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व निवासी आश्रमशाळा सौर ऊर्जेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव श्री. अप्पासाहेब धुळाज, महाऊर्जा तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow