विधानसभा निवडणुकीच्या अपयशाने खचून जाऊ नका - अंबादास दानवे
विधानसभा निवडणुकीच्या अपयशाने खचून जाऊ नका...
शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे शिवसैनिकांना आवाहन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) निवडणुकीत जय पराजय हा सुरूच असतो. विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पराभव झाला म्हणून या अपयशाने शिवसैनिकांनी खचून जाऊ नये, असे आवाहन शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा विधानसभा निहाय शनिवार, ता. 30 रोजी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
वैजापूर, कन्नड व सिल्लोड विधानसभा मतदार संघातील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी दानवे यांनी संवाद साधत मतदार संघातील निवडणुकिची माहिती घेतली. जिल्ह्यात पक्षाचा 6 विधानसभा मतदारसंघात पराभव झाला असेल तरीही प्रचंड मतांचा आशीर्वाद मतदारांनी प्रकट केला आहे. आगामी काळात दुप्पट शक्तीने संघटनात्मक ताकद उभी करुन पक्षाला पुन्हा सत्तेत बसल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार, यावेळी दानवे यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात शिवसेनेचा पराभव झाला असला तरीही युवकांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे प्रचंड ओढा वाढला आहे. राजकीय जीवनात प्रवेश करणाऱ्या क्षमतावान युवकांना सोबत घेऊन आगामी काळात पक्षात नवीन फळी तयार करणार आहे. संघटनात्मक ताकद वाढवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात पक्ष उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
कन्नड - सोयगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने दिलेल्या कौलाचा मी सन्मानपूर्वक स्वीकार करतो. मतदारसंघातील जनतेने 5 वर्ष दाखवलेला विश्वास मी सार्थ करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कसलेच प्रयत्न माझ्याकडून कमी पडले नाही. मात्र जनतेने या विधानसभा निवडणुकीत वेगळा निर्णय घेतला. जनतेने दिलेला कॉल मला मान्य असून आगामी काळातही मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत राहील असा, ठाम विश्वास उमेदवार उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केला.
सिल्लोड - सोयगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा निसटता पराभव झाला. अब्दुल सत्तार यांच्याशी शिवसेनेचा पावलोपावली संघर्ष आहे. छोट्याशा फरकाने आपला पराभव झाला असला तरीही आगामी काळात प्रचंड ताकदीने विजय खेचून आणू, असा विश्वास उमेदवार सुरेश बनकर यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी उमेदवार उदयसिंग राजपूत, सुरेश बनकर, जिल्हा समन्वयक रघुनाथ चव्हाण, किसान सेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब मोहिते, उपजिल्हाप्रमुख अवचित नाना वळवळे, अविनाश गलांडे, अंकूश सूंब, विठ्ठल बदर, तालुकाप्रमुख संजय मोटे, सचिन वाणी, सुभाष कानडे, रघुनाथ घारमोडे, दिलीप मचे, भास्कर आहेर, विधानसभा संघटक डॉ. आण्णासाहेब शिंदे, मनाजी मिसाळ, तालुका संघटक मनोज गायके, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटक लताताई पगारे, तालुका संघटक रुपालीताई मोहिते, युवासेना जिल्हा युवा अधिकारी विठ्ठल डमाळे, तालुका युवाधिकारी योगेश पवार, लखन ठाकूर व कैलास जाधव उपस्थित होते.
What's Your Reaction?