वृक्षारोपण व युवा संवाद उपक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शन

वृक्षारोपण ,युवासंवाद विशेष उपक्रम संपन्न.
* संस्कारक्षम युवा पिढीसाठी वाचन महत्वपूर्ण _ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.26(डि-24 न्यूज) संस्कारक्षम आणि सक्षम भावी पिढी निर्माण होण्यासाठी युवकांनी वाचन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील श्री गोरक्ष आयुर्वेदिक महाविद्यालय व शैक्षणिक संकुलात ‘वृक्षारोपण व युवा संवाद’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता . माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि गोरक्ष शैक्षणिक संकुल, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, उपशिक्षणाधिकारी श्रीमती गीता तांदळे, फुलंब्रीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती क्रांती धसवाडीकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. राजेश महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप सिरसाठ उपस्थित होते. गोरक्ष शैक्षणिक संकुलाचे संस्थापक मा. श्री. मोहन पाटील यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अवांतर वाचन चालू ठेवावे. संत साहित्य, इतिहास, आत्मचरित्रे, प्रेरणादायी ग्रंथ यांचे नियमित वाचन हे व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे.समाज काय म्हणतो याकडे लक्ष न देता स्वच्छ आणि निश्चित ध्येय ठेवून मार्गक्रमण केल्यास कोणतीही अडचण अडथळा ठरणार नाही. आत्मविश्वास व संयम यांच्या साहाय्याने तरुण पिढी देशाला नवे भविष्य देऊ शकतो. युवकांना क्षणिक आनंदासाठी दीर्घकालीन नुकसान करणाऱ्या सवयींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. "मी पणाचा त्याग करा, आणि स्वतःचे जीवन घडवताना समाजातही सकारात्मकता आणा,असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. गोरक्ष विद्यालयाच्या स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी प्रभावी संचलन सादर करत पाहुण्यांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक युद्धकला ‘मल्लखांब’ चित्तवेधक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जिल्हाधिकारी आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सहभागाने गोरक्ष शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा. श्रीमती अश्विनी लाठकर यांनी केले. संस्थापक अध्यक्ष मा. श्री. मोहनराव पाटील सोनवणे यांनी संस्थेची वाटचाल, उपक्रम आणि भविष्यातील योजना यांचा आढावा उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक मा. श्री. अभिलाष पाटील सोनवणे यांनी केले. गोरक्ष शैक्षणिक संस्था संकुलातील सुमारे 1500 विद्यार्थी तसेच परिसरातील शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, प्राध्यापक व केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम केवळ पर्यावरण संवर्धनापुरता मर्यादित न राहता, तरुण पिढीच्या मनात सकारात्मक विचार, राष्ट्रभक्ती व सामाजिक बांधिलकी रुजवणारा आहे,असे प्रास्ताविकात लाठकर यांनी सांगितले.
What's Your Reaction?






