मराठा युवकांनी आत्महत्या करु नका... कळकळीचे आवाहन, यासाठी काढली आंतरवाली सराटी पर्यंत मोटारसायकल रॅली

 0
मराठा युवकांनी आत्महत्या करु नका... कळकळीचे आवाहन, यासाठी काढली आंतरवाली सराटी पर्यंत मोटारसायकल रॅली

आत्महत्या करू नका... संदेश देण्यासाठी 

सकल मराठा समाजाने काढली बाईक रॅली... विविध आंदोलने करुन केला निषेध....

औरंगाबाद ते आंतरवली सराटी असा होता मार्ग... क्रांतीचौकात बेशरमांची झाडे हातात घेत केला शासनाचा निषेध....

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. राजकीय नेत्यांनी आपले दौरे रद्द करावे लागले आहे. तर रस्त्यावर टायर जाळणे, धरणे, ठिय्या आंदोलन, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, ठिय्या आंदोलन तर काही शहरात बंद पुकारला जात आहे. आंदोलनाने राज्य ढवळून निघाले आहे. 

युवकाच्या आत्महत्या आरक्षणासाठी वाढत असल्याने आत्महत्या करु नये यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने औरंगाबाद ते आंतरवाली सराटी पर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. 

तर क्रांतीचौक येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे तेथे बेशरमांची झाडे हातात घेत मराठा समाजाने शासनाचा निषेध केला. मराठा पंच कमेटीने जुनी भांडी ठेवून लाक्षणिक उपोषण केले.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी, व समस्त सकल मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सकल मराठा समाज शैक्षणिक मंच तर्फे रविवारी औरंगाबाद ते आंतरवाली सराटी अशी बाईक रॅली काढण्यात आली.

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या बाईक रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये चंद्रकांत चव्हाण, गणेश पवार, लक्ष्मण मुळे, राजकुमार बाबर पाटील, अशोक ढमढेरे, सुधाकर थोरात, दीपक शिंदे, एडवोकेट वैशाली कडू, मेघा थोरात, प्रा. लता बावणे, स्मिता पठारे, विजया पवार यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. राज्य सरकार मुद्दामहून मराठा समाजातील तरुणांची माथी भडकतील अशी वक्तव्य करून हे आंदोलन हिंसक वळणावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी समाजातील तरुण-तरुणींनी आत्महत्या करू नये आणि अतिशोक्तीपणा करू नये, हा संदेश देण्यासाठी छत्रपती औरंगाबाद ते आंतरवाली सराटी अशी 70 किलोमीटर ची बाईक रॅली काढण्यात आली. आपण करत असलेले अहिंसक आंदोलन आणि असहकार चळवळ हे दोन अस्त्रच सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देऊ शकतात, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मराठा पंच कमिटी तर्फे लाक्षणिक उपोषण

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रविवारी (दि.२९) मराठा पंच कमिटीतर्फे बेगमपुऱ्यातील संभाजी चौकातील मराठा मंदिर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

मराठा समाज कुणबी आरक्षण देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. जरांगे पाटील यांनी 40 दिवसाचा वेळ देऊनही सरकारने निर्णय घेतला नाही. आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे मराठा पंच कमिटी आरक्षणाशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी आंदोलन स्थळी जुनी भांडीही मांडण्यात आली होती.

उपोषणामध्ये मराठा पंच कमिटीचे अध्यक्ष नाना पवार, उपाध्यक्ष किशोर शिंदे, सचिव प्रकाश पटारे, सुरेश पवार, संजय जाधव, ज्ञानेश्वर जगताप, राजू झळके, सुभाष डोंगरे, बाळू विधाते, कचरूमामा शेळके, बाळकृष्ण ढवळे, संतोष शिंदे, अजिंक्य काळे, शिवाजी पडघन, संदीप गायकवाड आदी समाज बांधव सहभागी झाले होते.

क्रांती चौकात बेशरमाची झाडे लावून शासनाचा केला निषेध...

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांती चौकामध्ये रविवारी सकाळी 11 वाजता आंदोलन स्थळी बेशरमाच्या झाडे लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो बेशरमाच्या झाडाला लावले होते. या बेशरम सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, या निर्लज्ज सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय..., शब्द न पाळणाऱ्या या सरकारचे करायचे काय.... अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने समन्वयक गणेश उगले पाटील व विजय काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 25 ऑक्टोबरपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. मागील तीन दिवसांमध्ये शिट्टी बजाव, मशाल रॅली तसेच ढोल बजाव आंदोलन केले. तर आज बेशरमाची झाडे लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. 

आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे., जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है., अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पाळावा अन्यथा तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. याप्रसंगी गणेश उगले पाटील, गणेमू लोखंडे पाटील, जयाजीराव सुर्यवंशी, सुकन्या भोसले, अशोक वाघ पाटील, सरीन सरकटे, परमेश्वर नलावडे, अक्षय ताठे, जी.के.गाडेकर, वैभव बोडखे, पंढरीनाथ काकडे, लक्ष्मण नवले पाटील आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow