शाळेच्या पहिल्याच दिवशी 1.40 विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके, नियोजन पूर्णत्वाकडे...
शाळेच्या पहिल्याच दिवशी 1.40 लाख विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके...
महानगरपालिकेचे नियोजन पूर्णत्वाकडे आयुक्त अमोल येडगे यांची वितरण केंद्राला भेट...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) - शहरातील एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात नवीन पुस्तके पोहोचावीत आणि शाळाबाह्य होण्याचे प्रमाण शून्यावर आणावे, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने यंदा पाठ्यपुस्तक वितरणाचे अत्यंत नियोजनबद्ध नियोजन केले आहे. याअंतर्गत शहरातील 1 लाख 40 हजार 299 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी आज सिडको एन-1 येथील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये उभारण्यात आलेल्या पाठ्यपुस्तक साठवणूक व वितरण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी वितरण प्रक्रियेची पाहणी करून सर्व शाळांना वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी महानगरपालिकेने फेब्रुवारी 2026 मध्येच मागणी नोंदवून दूरदृष्टी दाखविली होती. त्यानुसार शहरातील 513 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 8 लाख 39 हजार 52 पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती.
पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्राकडून आतापर्यंत 6 लाख 60 हजार 10 पुस्तके प्राप्त झाली असून हे प्रमाण सुमारे 79 टक्के आहे. उर्वरित पुस्तकांचा पुरवठाही लवकरच पूर्ण होणार असून 8 ते 12 जूनदरम्यान सर्व शाळांना केंद्रनिहाय पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.
महानगरपालिकेच्या नियोजनानुसार 15 जून रोजी शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यावर्षी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दुसरी, तिसरी आणि चौथीच्या सुधारित पाठ्यपुस्तकांचा साठाही महानगरपालिकेकडे उपलब्ध झाला आहे. साठवणूक केंद्रातील सुरक्षितता, व्यवस्थापन आणि वितरणाची तयारी पाहून आयुक्त अमोल येडगे यांनी समाधान व्यक्त केले.
शहरात सध्या 344 मराठी, 158 उर्दू, 5 हिंदी आणि 6 इंग्रजी माध्यमांच्या अशा एकूण 513 शाळा कार्यरत आहेत. या सर्व शाळांपर्यंत पुस्तके वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी उपआयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, प्रशासन अधिकारी संजीव सोनार, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय कोल्हे व रईसा खान बेगम तसेच समग्र शिक्षाचे समन्वयक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
What's Your Reaction?