शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे दोन दिवसीय युवा महोत्सव, कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध
103 वर्षांच्या ज्ञानपरंपरेच्या साक्षीने जिल्हा युवा महोत्सव
11 व 12 सप्टेंबरला... शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात विविध कलागुणांना मिळणार व्यासपीठ...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- मराठवाड्यातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या 103 वर्षांच्या ज्ञानपरंपरेच्या साक्षीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा युवा महोत्सव-2026 आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त आयोजनातून हा महोत्सव 11 व 12 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.
महोत्सवाचा उद्घाटन समारंभ 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयातील वंदे मातरम् सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी राहणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल मोरेश्वर सावे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, मा. श्री. हनुमानजी राजपुरकर, तसेच मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी
विक्रम काळे यांची प्रमुख सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमासाठी शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली संतोष देशमुख तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांचीही उपस्थिती राहणार आहे.
विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना संधी
दोन दिवस चालणाऱ्या या युवा महोत्सवात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी, युवा कलावंत आणि कला रसिक सहभागी होणार आहेत. सात रंगमंचांवर तब्बल 28 कलाप्रकारांचे सादरीकरण आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
यामध्ये एकांकिका, मिमिक्री, मुकाभिनय, लोकनृत्य, आदिवासी नृत्य, लोकवाद्यवृंद, भारतीय शास्त्रीय व सुगम गायन, तालवाद्य, स्वरवाद्य, नृत्य, नाट्यसंगीत, समूहगायन, प्रहसन, चित्रकला, पोस्टर, व्यंगचित्र, कोलाज, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, वक्तृत्व, वादविवाद आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे.
समारोप व पारितोषिक वितरणाला मान्यवरांची उपस्थिती
12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. डॉ. प्रवीण वाके राहणार आहेत.
समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत असणार आहेत.
यावेळी प्रमुख सन्माननीय उपस्थित म्हणून माजी आमदार श्रीकांत जोशी आणि माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. श्री. भागवत कराड उपस्थित राहणार आहेत.
समारोप कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. वैशाली संतोष देशमुख आणि विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांचीही उपस्थिती राहणार आहे.
विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाने गेल्या 103 वर्षांत ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, प्रशासन, उद्योग, सामाजिक क्षेत्र तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांत योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींना घडविले आहे. या ऐतिहासिक परंपरेला आधुनिक पिढीच्या कलागुणांची जोड देत जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवामुळे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवा कलावंत आणि कला रसिकांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी मिळणार असून महाविद्यालयाचा ऐतिहासिक परिसर दोन दिवस सांस्कृतिक उत्साहाने भारून जाणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.वैशाली देशमुख यांनी दिली आहे.
What's Your Reaction?