शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रुर थट्टा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात...!
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा - हर्षवर्धन सपकाळ
शहरात जनआक्रोश दुष्काळ मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14 (डी-24 न्यूज) -: राज्यात दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी 5 हजार रुपये देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर शहरात निघालेल्या जन आक्रोश दुष्काळ मोर्चाला संबोधित करताना सपकाळ यांनी हि टिका केली.
त्यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना अस्मानी संकटापेक्षा सुलतानी संकट अधिक जालीम असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांचे सरसकट अनुदान देण्याची मागणी केली. पाच हजारांची मदत जाहीर करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार थांबवा, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज पैठण गेट येथून जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आयोजित सभेत सपकाळ बोलत होते. मोर्चामध्ये शेतकरी, महिला आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभेच्या समारोपानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्या...
सपकाळ यांनी सत्ताधारी भाजप-महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. निवडणुकीत आमदार-खासदार खरेदी करण्यासाठी आणि उद्योगपतींची कर्जे माफ करण्यासाठी सरकारकडे प्रचंड पैसा आहे; मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पैसा नसल्याचे चित्र आहे, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा असताना सरकारकडून ठोस निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई आणि दिल्लीतील सरकार शेतकऱ्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत बैठका, पथकांचा दौरा करून चालणार नाही थेट मदत शेतकऱ्यांना द्या. ही वेळ राजकारण करण्याची नव्हे, तर संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण, पंचनामे किंवा अभ्यासाच्या प्रक्रियेत वेळ न घालवता तातडीने मदत द्यावी. सरसकट कर्जमाफी करावी, शेतमजुरांना सानुग्रह अनुदान द्यावे, मनरेगाची कामे सुरू करावीत आणि शेतकऱ्यांच्या मुलांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.
चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा...
दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी, विद्यार्थ्यांना एसटी पास मोफत द्यावा आणि स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सावकार आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जात असल्यास काँग्रेस कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. संबंधितांना मदत करण्यासाठी कार्यकर्ते पुढाकार घेतील, अशी ग्वाही सपकाळ यांनी दिली.
अदानी-अंबानींच्या कर्जमाफीवरून डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचा सवाल
महाराष्ट्रातील शेतकरी यंदा दुष्काळाच्या तीव्र संकटाचा सामना करत असूनही भाजप-महायुती सरकारला शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या वेदना जाणवत नसल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
अदानी-अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींची 20 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली जात असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यास सरकारला अडचण काय, असा संतप्त सवाल डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी उपस्थित केला.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या मोर्चात महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. कल्याण काळे, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, नांदेडचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष सय्यद अक्रम, प्रदेश सरचिटणीस डॉ. रेखा चव्हाण, जेसिका शिंदे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव सीमा थोरात यांच्यासह डॉ. सरताज पठाण, कमाल फारुकी, गुलाब पटेल, मोहम्मद जाकेर, मराठवाड्यातील विविध जिल्हा काँग्रेस कमिट्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, डॉ. शिवाजीराव काळगे आणि डॉ. कल्याण काळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. माजी महिला जिल्हाध्यक्ष हेमा पाटील
यांनी आभार मानले.
What's Your Reaction?