श्रीराम मंदिर देणगी चोरी प्रकरणाचे फाॅरेन्सिक ऑडिट करण्याची काँग्रेसची मागणी...!

 0
श्रीराम मंदिर देणगी चोरी प्रकरणाचे फाॅरेन्सिक ऑडिट करण्याची काँग्रेसची मागणी...!

श्रीराम मंदिर देणगी चोरी प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या पंखुडी पाठक यांची मागणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)- उत्तर प्रदेश अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरीचे प्रकरण गाजत असतानाच, या मंदिरासाठी जमीन खरेदी व्यवहारातही मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. मंदिराची 2 कोटी रुपयांची जमीन 18 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली आहे. असा आरोप अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रवक्त्या पंखुडी पाठक यांनी रविवारी सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. देणगी चोरी प्रकरणी गप्प असलेल्या पंतप्रधानांवरही त्यांनी निशाणा साधला.

त्या म्हणाल्या की, प्रत्येक निवडणुकीत रामाच्या नावाने मते मागणारे, नेहमी लहानसहान मुद्यावर 'मन की बात' करणारे देशाचे पंतप्रधान आता मात्र 'चुप्पी' साधून आहेत. यावर ते एक शब्दही बोलत नाही. श्रीराम मंदिर देणगी प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करावे, मंदिराला किती दान मिळाले, त्यात रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू आदीं किती होत्या, यातील किती रक्कम व वस्तूंची चोरी झाली, आदी सर्व माहिती या ऑडिटमधून समोर येईल. चोरी झाल्याचे स्पष्ट झालेले असतानाही, अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केला गेला नाही, एसआयटी नेमली असून, त्याचा अहवाल आलेला नाही. या प्रकरणात चालक, लिपीक अशा लहान कर्मचाऱ्यांना आरोपी केले जात आहे, मात्र ट्रस्टचे चंपत राय, अनिल मिश्रा, गोविंद देवागिरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. त्यांच्या विरोधात एफआयआर आतापर्यंत दाखल का झाली नाही. त्यांच्यावरही जबाबदारी निश्चित करावी. श्रीराम मंदिर ट्रस्ट बरखास्त करून सर्वांना अटक करावी इतर मागण्याही त्यांनी यावेळी केल्या. उत्तराखंड येथील बद्रीनाथ मंदिरातही अशाचप्रकारे देणगी घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला खासदार डॉ. कल्याण काळे, जेष्ठ नेते नामदेवराव पवार, माजी मंत्री अनिल पटेल, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, प्रकाश मुगदिया, इब्राहिम पठाण, मोहन देशमुख, अशोक डोळस आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow