सिध्दार्थ उद्यानातील सिध्दार्थ नामक वाघाचा मृत्यू, प्राणीप्रेमींमध्ये हळहळ

 0
सिध्दार्थ उद्यानातील सिध्दार्थ नामक वाघाचा मृत्यू, प्राणीप्रेमींमध्ये हळहळ

सिद्धार्थ उद्यानातील 17 वर्षीय वयोवृद्ध वाघाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30 (डी-24 न्यूज) :- सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील 'सिद्धार्थ' नामक 17 वर्षीय वयोवृद्ध वाघाचा गुरुवारी (दि. 29 ऑक्टोबर) रात्री 9 वाजता मृत्यू झाला. या घटनेमुळे प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांसह प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

साधारणपणे प्राणिसंग्रहालयातील वाघांचे सरासरी आयुर्मान 16 ते 18 वर्षे असते. सिद्धार्थ वाघाचे वय अधिक झाल्याने मागील काही दिवसांपासून त्याच्या शारीरिक हालचाली मंदावल्या होत्या. तसेच त्याने अन्नग्रहणही कमी केले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत होता.

या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. वाघाने अन्न खाणे सोडल्याने त्याला सलाईन, आवश्यक प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) आणि टॉनिकची इंजेक्शन्स देऊन वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, वाढत्या वयामुळे त्याने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर गुरुवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली.

मृत्यूनंतर खडकेश्वर येथील जिल्हा पशुसंवर्धन चिकित्सालयाचे डॉ. आर. डी. इंगळे, सहाय्यक आयुक्त डॉ. साहेबराव जमाल, डॉ. तळेकर, एम. जे. पशुवैद्यकीय अधिकारी, डॉ. जे. एस. भगत आणि डॉ. गजानन चव्हाण यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले.

त्यानंतर वनविभागाचे वनसंरक्षक प्रमोदचंद्र लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण, वनपाल अविनाश राठोड आणि वनरक्षक डी. एस. पवार यांच्या उपस्थितीत पंचनामा करून वाघावर नियमानुसार अग्निदाह संस्कार करण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow