सुविधांचे बळकटीकरण आणि खेळाडूंना सवलतींचा क्रिडा धोरणात समावेश करणार - एड माणिकराव कोकाटे
विकसित महाराष्ट्र २०४७:युवा व क्रीडा संवादात खेळाडू, प्रशिक्षक, संघटकांनी केल्या सुचना
सुविधांचे बळकटीकरण आणि खेळाडूंना सवलतींचा क्रीडा धोरणात समावेश करणार-ऍड. माणिकराव कोकाटे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25 (डि-24 न्यूज)- राज्य क्रीडा क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विकसित महाराष्ट्र 2047 मध्ये युवा व क्रीडाक्षेत्रात राज्याचे धोरण ठरविण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील जाणकारांचे मत विचारात घेतले जात आहेत. या धोरणात शालेयस्तर, तालुकास्तरावर क्रीडा सुविधा विकास व खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी सुविधा, सवलतींचा धोरणात समावेश करण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांनी आज केले.
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत मराठवाडा विभागाचा युवा व क्रीडा संवाद कार्यक्रम आज संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमास माजी मंत्री सुरेश नवले, भारतीय खेल प्राधिकरण च्या संचालक डॉ. मोनिका घुगे, क्रीडा विभागाचे उपसंचालक उदय जोशी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, आयर्न मॅन डॉ. नितीन घोरपडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक सचिन देशमुख, एकनाथ साळोखे, विजय पाथ्रीकर,उदय कहाळेकर, शिवराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या संवाद कार्यक्रमात शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते सागर मगरे, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ. शुभम धूत,राष्ट्रीय खेळाडू निकिता लंगोटे, क्रीडा भारती संघटक डॉ. मीनाक्षी मुलिया, क्रीडा संघटक महेश इंदापूरे,शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते क्रीडा संघटक डॉ. माधव शेजूळ,डॉ. दिनेश वंजारे,राकेश खैरनार,तायक्वोदो असो. चे माधव बारगजे, गोपाळ धांडे,ऍड. अजहर पठाण,साक्षी कराड,मकरंद जोशी तसेच क्रीडा व युवक कल्याण क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार मांडले.
ऍड. कोकाटे म्हणाले की, राज्यात उत्कृष्ट खेळाडू घडवून क्रीडा संस्कृती चा विकास करण्याचा शासनाचा मानस आहे.मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळांमध्ये ओपन जिम देण्यात येतील. शालेयस्तरावर क्रीडा कौशल्य विकास करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतील. खेळाडू घडविण्यासोबत सर्व व्यायाम संस्कृती रुजवून सुदृढ व आरोग्य संपन्न नागरिक घडविण्यास शासन चालना देईल. युवा कल्याण क्षेत्रात विविध उपक्रमांना चालना देण्यात येईल. युवकांमध्ये व्यसनमुक्ति, देशप्रेम इ. संस्कार रुजविण्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश शासनाच्या धोरणात असेल, असेही ऍड. कोकाटे यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक तपासणी साठी फिरते आरोग्य पथक थेट शाळे पर्यंत पोहोचविले जाईल. जिल्हा क्रीडा संकुलांमधील सुविधांची तपासणी केली जाईल. राज्यात अधिकाधिक क्रीडा सुविधा निर्माण करण्याचा मानस ऍड. कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रास्ताविक उपसंचालक शेखर पाटील यांनी केले.तर सूत्रसंचालन बिऱ्हाडे यांनी केले. आभार जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी मानले.
What's Your Reaction?