हद्दपारीच्या नोटीसीनंतर मंगेश साबळे अक्रामक, महाराष्ट्र दौरा करण्याची घोषणा...
हद्दपारीच्या नोटिशीनंतर मंगेश साबळे आक्रमक; महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 17 (डि-24 न्यूज) :- फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश साबळे यांना छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांतून हद्दपार करण्याबाबत पोलिस प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईनंतर साबळे समर्थक, कार्यकर्ते आणि गेवराई पायगा ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
साबळे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून हद्दपारीच्या नोटिशीतील आरोपांबाबत आपली भूमिका मांडली. नोटिशीत दोन व्यक्तींच्या कथित जबाबांचा आधार घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. एका व्यक्तीने मारहाण करून साडेतीन हजार रुपये घेतल्याचा, तर दुसऱ्या व्यक्तीने गिरजा नदी पुलाजवळ अडवून मारहाण करत साडेचार हजार रुपये घेतल्याचा आरोप केल्याचे साबळे यांनी सांगितले.
मात्र, हे आरोप खोटे असून आपल्याविरोधात अज्ञात साक्षीदारांच्या जबाबांचा आधार घेतला जात असल्याचा दावा साबळे यांनी केला. संबंधित व्यक्तींची नावे जाहीर का केली जात नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात विविध आंदोलनांमुळे साबळे चर्चेत आले होते. त्याच पार्श्वभूमीचा उल्लेख करत त्यांनी आपल्यावर आता काही हजार रुपयांच्या कथित लुटीच्या आरोपांच्या आधारे हद्दपारीची कारवाई होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणे, जिल्हा परिषद प्रशासनाला जाब विचारणे तसेच जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे यामुळे कारवाई होत नसून, खोट्या तक्रारींच्या आधारे हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप साबळे यांनी केला.
या कारवाईमागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. पोलिस प्रशासनाकडून संविधानाचा गैरवापर करून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा साबळे यांनी केला आहे.
हद्दपारीची नोटीस स्वीकारून महाराष्ट्र दौरा करणार
हद्दपारीची नोटीस स्वीकारल्यानंतर आपण महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याची घोषणा मंगेश साबळे यांनी केली. या दौऱ्याच्या माध्यमातून जनतेसमोर आपली भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला आगामी काळात सामाजिक तसेच राजकीय स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू करुन युवकांचे प्रश्न उपस्थित करणार असल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
दरम्यान, हद्दपारीच्या नोटिशीतील आरोपांबाबत मंगेश साबळे यांनी केलेले दावे त्यांच्या म्हणण्यानुसार आहेत. या प्रकरणी संबंधित पोलिस प्रशासनाची अधिकृत बाजू उपलब्ध झालेली नाही.
What's Your Reaction?