10 टक्के मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र कधी मिळणार, तरुणांचा भ्रमनिरास करु नका - विनोद पाटील
10 टक्के मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र कधी मिळणार...?
मराठा तरुणांचा भ्रमनिरास करू नका- विनोद पाटील
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर झालेले आहे. परंतु 15 दिवस झाले तरीही समाजबांधवांना जात प्रमाणपत्र वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याची संधी हुकणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आरक्षणाचे विधेयक 20 फेब्रुवारी रोजीच्या विशेष अधिवेशनात एकमताने मंजूर झाले, त्यानंतर विधी आणि न्याय विभागाने 26 फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील शासन राजपत्र प्रकाशित केले. त्यामुळे आता मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्रिपल इंजिन सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले आहे. या निर्णयानंतर मराठा समाजातून कही खुशी कही गम अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले. मराठा आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे यांनी मात्र राज्य शासनाने दिलेले हे 10 टक्के आरक्षण नाकारले आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी लावून धरलेली आहे. त्यांनी आपला लढा आणखी तीव्र केला आहे.
दुसरीकडे शासनाच्या विविध विभागांमधून नोकर भरतीच्या जाहिराती काढण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या आरक्षणातून नोकरी मिळावी यासाठी मराठा समाजातील बेरोजगार तरुणवर्ग मोठ्या आशेने शासनाकडे बघत आहे. तसेच नवीन शैक्षणिक वर्षही सुरू होणार असून, त्यासाठी जात प्रमाणपत्र मिळावे, यासाठी पालकही प्रयत्नशील आहेत. 10 टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र प्रशासनाकडून वितरीत होत नसल्याने समाजबांधवांमध्ये प्रचंड नाराजी पसरत आहे.
आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं, असा दावा राज्य सरकार करत आहे. पण. कुठे आहे आरक्षण...? त्याचा काहीही फायदा समाजाला पोहचताना आम्हाला दिसत नाही. राज्य सरकारचे अधिकारी जबाबदारीने सांगतात की, आम्हांला जात प्रमाणपत्र वितरणाबाबत कुठल्याही सूचना मिळालेल्या नाहीत. शासनाने पोलीस भरती काढली असून, प्रमाणपत्रच नसेल तर आमच्या मराठा तरुणांना लाभ मिळणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आणि महसूलमंत्री यांनी प्रमाणपत्र वितरणाबाबत तात्काळ अधिकाऱ्यांना आदेशित करावे. समाज तुमच्याकडे आशेने बघत आहे, आमच्या तरुणांचा भ्रमनिरास करू नका असे आवाहन विनोद पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
What's Your Reaction?