मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठांना "सक्षम"चे सहाय्य
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठांना ‘सक्षम’चे सहाय्य
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) आगामी लोकसभा निवडणूकीत निवडणूक आयोग विविध तंत्रस्नेही उपाययोजना मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी करीत आहे. आयोगाने तयार केलेले ‘सक्षम’ नावाचे मोबाईल ॲप दिव्यांग आणि वयोवृद्ध व्यक्ति (85 वर्षे व त्यापेक्षा अधिक) मतदान करण्यासाठी सहाय्य करणार आहे.
26532 दिव्यांग तर 45053 वयोवृद्ध मतदार
जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा मतदार संघ आहेत. त्यातील सिल्लोड, फुलंब्री व पैठण हे विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघास जोडलेले आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, गंगापूर व वैजापूर हे विधानसभा मतदार संघ औरंगाबाद लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहेत. संपूर्ण जिल्ह्यात 16 हजार 60 पुरुष तर 10 हजार 460 महिला व 12 इतर असे एकूण 26532 दिव्यांग मतदार आहेत. जालना लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या विधानसभा मतदार संघांतील दिव्यांग मतदार संख्या 9532 तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या विधानसभा मतदार संघातील दिव्यांग मतदार संख्या 17 हजार आहे. त्याचप्रमाणे वय व्यवर्षे 85 पेक्षा अधिक असलेले वयोवृद्ध मतदार संख्या जिल्ह्यात 18 हजार 156 पुरुष, 26 हजार 897 महिला अशी एकूण 45 हजार 53 इतकी आहे. त्यात जालना लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या विधानसभा मतदार संघात 16 हजार 122 तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या विधानसभा मतदार संघात 28 हजार 931 मतदार वयोवृद्ध आहेत.
‘सक्षम’द्वारे आवश्यक सुविधांसाठी नोंदणी
दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना सक्षम ॲप द्वारे मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्याची मागणी नोंदवावयाची आहे. त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांचे मतदारसंघ व स्थाननिश्चिती यंत्रणेला करणे शक्य होऊन आवश्यक मदत जसे वाहतुक व्यवस्था, व्हिल चेअर, सहाय्यक इ. पोहोचविण्याची व्यवस्था करता येईल.
मतदान केंद्रांवरही सुविधा
मतदान केंद्रांवरही दिव्यांगांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, रांगांमध्ये बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था आवश्यकतेनुसार व्हिल चेअर, सहाय्यक स्वयंसेवक त्यात एनसीसी, स्काऊट- गाईड, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांचा समावेश असेल. त्याच प्रमाणे मेडीकल किट, तसेच माहितीचे फलक, मुक बधीरांसाठी सांकेतिक भाषेत संवाद साधणारे स्वयंसेवक , दृष्य माहिती , ब्रेल लिपीतील सुचना इ. सुविधा करण्याचेही आयोगाचे निर्देश आहेत. तसेच दिव्यांगत्वाचे प्रमाण अधिक असणे, किंवा वृद्धत्वामुळे हालचालींवर मर्यादा असल्यास अशा व्यक्तिंना टपाली मतदानासाठीही उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. मतदारसंघनिहाय दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या उपलब्धतेबाबत विभागीय आयुक्त हे मूल्यमापन करणार आहेत. तसेच दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांशी साधावयाच्या संवादाबाबत मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही होणार आहे.
1959 हेल्पलाईन व व्हिडीओ कॉल सुविधा जिल्ह्यातही यासंदर्भात कार्यवाही सुरु झाली आहे. सामाजिक न्याय विभागाचे सहा. आयुक्त वाबळे हे दिव्यांग व वयोवृद्ध मतदार सुविधेसाठीचे नोडल अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात 1950 हा हेल्पलाईन नंबर स्थापित करण्यात आला असून या क्रमांकावरही दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांशी संवाद साधण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तिंची नियुक्ती करण्यात आली आहे. मुक बधीर मतदारांसाठी सांकेतिक भाषेत संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉल सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन सर्व संबंधितांना निर्देशित करण्यात आले आहे.
What's Your Reaction?