अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या
वाहनांवर कारवाई करा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज):- जिल्ह्यात वाळूची अनधिकृत वाहतुक करणारी वाहनांवर कारवाई करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. पोलीस, महसूल आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त गस्त घालून कारवाई करावी,असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड, जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, उप अधीक्षक भुमिअभिलेख निलेश उंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आर.जी. देसले जिल्हा मुख्यालयातून तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे दृरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुक केल्याप्रकरणी वर्षभरात 174 कारवाई करण्यात आल्या. या प्रकरणी 3 कोटी 33 लाख रुपये इतका दंड आकारण्यात आला असून त्यापैकी 1 कोटी 97 लाख 53 हजार रुपये इतक्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. 23 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून 167 वाहने व 4 यंत्रे जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण 10 हजार 46 प्रास वाळू चार प्रमुख वाळू डेपोवर उपलब्ध आहे. त्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या वापरासाठी 4701 ब्रास तर शासकीय कामांसाठी 4374 ब्रास वाळू उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, जिल्ह्यातील खदानींनी मोजणी भुमिअभिलेख विभागामार्फत करण्यात यावी. वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुक हा गंभीर विषय असून याबाबत महसूल, पोलीस, परिवहन विभागाच्या संयुक्त पथकांनी कारवाई करावी. विना क्रमांक हायवांना पकडून गुन्हे दाखल करावे. रात्रीची गस्त सुरु करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
What's Your Reaction?






