आईने व सावत्र पित्याने पोटच्या गतिमंद मुलाच्या खूनाचा 24 तासात उलगडा, दोघांना अटक...!
हर्सूल-सावंगी बायपास परिसरात आढळलेल्या बालकाच्या हत्येचा 24 तासांत उलगडा; सावत्र वडील व जन्मदात्या आईला अटक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि.20(डि-24 न्यूज)- हर्सूल-सावंगी बायपास परिसरातील एका शेतात 5 वर्षीय गतिमंद बालकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा गुन्हे शाखा व एमआयडीसी सिडको पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावत बालकाच्या सावत्र वडिलांसह जन्मदात्या आईला अटक केली आहे. संतोष सोनाजी ढाळे (वय 34, राहणार मोप, जिल्हा वाशीम) आणि आई पूजा हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बालक ओंकार हा गतिमंद असल्याने त्याची देखभाल करणे आरोपी दाम्पत्याला जड जात होते. यामुळे नव्या संसारात अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणावरून दोघांनी कट रचून बालकाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
पूजाचा पहिला विवाह संदीप पाडेवाड यांच्याशी झाला होता. त्यांना मुलगी शुभांगी (वय 10) व मुलगा ओंकार (वय 5) अशी दोन मुले होती. काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर पूजाने मुलगी सासरी सोपवली, तर ओंकारला सोबत घेऊन ती मजुरीच्या निमित्ताने जालना येथे राहत होती.
काही महिन्यांपूर्वी संतोष ढाळे याच्याशी तिची ओळख झाली आणि दोघांनी शिर्डी येथे प्रेमविवाह केला. त्यानंतर ते चिकलठाणा परिसरातील सवित्रीनगर येथे वास्तव्यास होते. मात्र, ओंकारच्या गतिमंद अवस्थेमुळे त्याची काळजी घेणे अवघड जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच संतोष हा दारूच्या नशेत मुलाला वारंवार मारहाण करत असल्याची माहितीही तपासात पुढे आली.
अखेर मुलगा कायमचा अडसर ठरत असल्याच्या रागातून दोघांनी मिळून ओंकारची हत्या केली व मृतदेह हर्सूल-सावंगी बायपास परिसरातील शेतात फेकून दिला. मृतदेह आढळताच पोलिसांनी तांत्रिक तपास व चौकशीची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या चोवीस तासांत आरोपींना गजाआड केले.
या अमानुष घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून निष्पाप बालकाच्या हत्येने समाजमन हेलावून गेले आहे.
What's Your Reaction?